इंदूर, 6 फेब्रुवारी : एकीकडे राम मंदिराच्या मुद्यावरून राजकारण तापललेलं असताना रियल लाईफमधील रामानं मात्र 'काँग्रेससाठी शिवधनुष्य' उचलण्याचा निर्णय घेतला आहे. नव्वदच्या दशकामध्ये रामायण ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. रामानंद सागर यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेतील रामाची भूमिका साकरली होती ती अरुण गोवील यांनी. अरुण गोविल लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात दिसू शकतात. लोकसभा निवडणुकीमध्ये अरुण गोविल काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवू शकतात अशी माहिती टाईम्स ऑफ इंडियानं दिली आहे. असं झालं तर मध्य प्रदेशमध्ये मोठा सामना रंगण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या बैठकीमध्ये इंदूरच्या जागेसाठी अरुण गोविल यांच्या नावाची चर्चा झाली. मध्य प्रदेशमध्ये 15 वर्षानंतर सत्ता मिळवल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं 20 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. इंदूर हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन सलग आठ वेळा विजयी झाल्या आहेत.
भोपाळ आणि इंदूरनं भाजपला नेहमीच साथ दिली आहे. या ठिकाणी मागील तीस वर्षामध्ये भाजपला एकदाही पराभवाचं तोंड पाहायाला लागलेलं नाही. त्यामुळे आता अरुण गोविल यांना उमेदवारी दिल्यास भाजपचा विजयी रथ रोखला जावू शकतो असं काँग्रेसमधील एका गटाला वाटतं. त्यामुळे 'राम' सुमित्रेला आव्हान देणार का अशी चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे.
दरम्यान, काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनी यापूर्वी करीना कपूर आणि प्रियंका गांधी यांच्या नावाचा आग्रह धरला होता. पण, आता अरुण गोविल यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे इंदूरमध्ये काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
करिनाचा नकार
करिना कपूरनं आपण राजकारणात येण्यासाठी उत्सुक नसल्याचं यापूर्वीचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे इंदोरमधून प्रियांका गांधी की अरूण गोविल यांना उमेदवारी मिळणार हे पाहावं लागणार आहे.