15 जुलै : गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांची वाढती लोकप्रियता लक्षात घेता भाजपने एक अजब निर्णय घेतला. पुढच्या महिन्यात हैदराबादमध्ये नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. त्यात उपस्थित राहणार्या प्रत्येकाकडून 5 रुपये प्रवेश फी घेण्याचा पक्षाचा विचार आहे. हा पैसा उत्तराखंडमधल्या मदतकार्यासाठी देण्यात येणार आहे. प्रवेश फी असूनही सभांना प्रचंड गर्दी खेचणारे मोदी हे देशातल्या मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत, असं भाजपचं मत आहे.
गुजरात निवडणुकीत नरेंद्र मोदींनी हॅट्रटीक साधल्यानंतर मोदींचं पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार असल्याची चर्चा सुरू झाली. गुजरातमध्ये विजयानंतर गोव्यात झालेल्या भाजपच्या बैठकीत नरेंद्र मोदींची भाजपच्या प्रचारप्रमुखपदासाठी निवड करण्यात आली. ही निवड म्हणजे नरेंद्र मोदींची राष्ट्रीय राजकारणात एंट्री त्यामुळे पंतप्रधानपदासाठी उमेदवार मोदीच यावर शिक्कामोर्तब झालं. त्यांच्या निवडीमुळे भाजप आणि मोदी समर्थकांनी एकच जल्लोष केला. पण त्यांच्या निवडीमुळे लालकृष्ण अडवाणी नाराज झाले पण त्यांची नाराजी जास्त दिवस राहिली नाही.
त्यानंतर नरेंद्र मोदींची घोडदौड सुरू झाली. उत्तराखंडमध्ये महाप्रलयात गुजरातमधील अडकलेल्या गुजराथी लोकांना वाचवणं, सोशल साईटसवर ओबामांच्या लोकप्रियेतला टक्कर देणं अशा अनेक घटनामुळे मोदी चर्चेत राहिले आणि आहे. त्यातच मागिल आठवड्यात रॉयटर्स या संस्थेनं नरेंद्र मोदींची घेतलेली मुलाखत चांगलीच गाजली. यावरून अनेक वादही झाले. मोदींनी मी, हिंदू राष्ट्रवादी आहे असं म्हटलं. पण त्यांनी गुजरात दंगली बद्दल केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर टीका झाली. रविवारी पुण्यात झालेल्या सभेत मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. त्यामुळे आज काँग्रेसने जोरदार प्रतिहल्ला चढवला. मोदींची प्रचारप्रमुखपदी निवड झाल्यानंतर भाजप म्हणजे मोदी आणि मोदी म्हणजे भाजप असं समिकरण तयार झालाय. त्यामुळेच त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा किती आणि कसा होता हेच यावरून दिसून येतेय.