27 जून : उत्तराखंडमध्ये महाप्रलयानंतर साथीच्या आजारांचा धोका निर्माण झालाय. तो टाळण्यासाठी आता केदारनाथमध्ये मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार सुरू झालेत. अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहांचे फोटो आणि डीएनए सॅम्पल्स घेतले जात आहे. दुसरीकडे बचावकार्यही युद्धपातळीवर सुरू आहे. अजूनही पाच हजार लोक उत्तराखंडमध्ये अडकलेत.
सध्या हर्शीलमध्ये वातावरण स्वच्छ आहे. तर बद्रीनाथमध्ये हवामान खराब आहे. त्यामुळे बद्रीनाथमध्ये आज बचावकार्य सुरू झालेलं नाही. मात्र, आज बद्रीनाथहून सुटका झालेले 15 यात्रेकरू जोशीमठमध्ये पोहोचले आहे. हर्शीलमध्ये हवाई मार्गानं बचावकार्य सुरू झालंय. पुढच्या 48 ते 72 तासांमध्ये सर्व बचावकार्य पूर्ण होईल असं सरकारतर्फे सांगण्यात येतंय.
पण, अजूनही काही गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे आणि गेल्या आठ दिवसांत त्यांच्यापर्यंत मदत पोहोचू शकलेली नाही. अद्यापही 5 हजार लोक निरनिराळ्या ठिकाणी अडकलेले आहेत. दरम्यान, केदारनाथमध्ये अजूनही 10 फूट ढिगारा आहे. त्याखाली सापडलेलं कोणी वाचलं असण्याची शक्यता अतिशय धूसर आहे.