उत्तराखंडमध्ये प्रलय, मृतांचा आकडा 102 वर

उत्तराखंडमध्ये प्रलय, मृतांचा आकडा 102 वर

  • Share this:

UTTARAKHAND rain333उत्तराखंड 19 जून : मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये न भूतो न भविष्यती पूर आलाय. या पुरामध्ये आतापर्यंत किमान 102 जणांचा मृत्यू झालाय. चारधाम यात्रेसाठी गेलेले हजारो पर्यटक आणि यात्रेकरूंसह 72 हजार लोक अडकले आहे. या पुराचा सर्वाधिक फटका केदारनाथला बसल्याचं आता दिसतंय. केदारनाथमध्ये आतापर्यंत 50 मृतदेह सापडले आहेत. मात्र, हा आकडा एक हजारापर्यंत जाऊ शकतो अशी भीती तिथल्या आमदारांनी व्यक्त केली.

केदारनाथमधल्या गौरीकुंडमध्ये पाच हजार गाईड्सनी त्यांच्या प्राण्यांसह आश्रय घेतला होता. ते सर्व बेपत्ता असल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान, ठिकठिकाणी अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी लष्कर आणि राष्ट्रीय आपत्ती मदतकार्य दलाची 12 पथकं कामाला लागलीत. पिथोडगड, रुद्रप्रयाग, गढवाल या जिल्ह्यांत जास्त जिवीतहानीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उत्तराखंडमध्ये आणखी मुसळधार पाऊस होण्याचा वेधशाळेनं अंदाज वर्तवलाय.

त्यामुळे मदतकार्यात आणखी अडथळे येणार असं दिसतंय. सततच्या पावसामुळे संचार यंत्रणेचाही बोर्‍या वाजलाय. अडकलेल्या यात्रेकरूंना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात येतेय, पण मोठ्या प्रमाणात पूर आल्यानं हेलिकॉप्टर उतरवणं कठीण होत असल्याचं अधिकार्‍यांनी सांगितलं. हिमाचल प्रदेशातही पुरामुळे जिवीतहानी झाली. उत्तर भारतात आतापर्यंत किमान 131 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.

केदारनाथ मंदीर पाण्याखाली

उत्तराखंडमध्ये केदारनाथ मंदीर परिसरात ढगफुटी झाल्यानं केदारनाथ मंदिर अर्ध्याहून अधिक पाण्याखाली गेलंय. मंदिराभोवती चिखल आणि गाळ जमा झाल्याचं दिसतंय. केदारनाथपुरीमध्ये मंदीर आणि काही मोजक्या वास्तू वगळता संपूर्ण गाव पुरानं उद्धवस्त झाल्याची भीती व्यक्त केली जातेय. सगळीकडे चिखल आणि गाळ आहे. याखाली किती जण अडकले, याचा निश्चित आकडाही सांगता येत नाहीय.

महाराष्ट्र राज्य सरकारकडून 10 कोटींची मदत

उत्तराखंडसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने 10 कोटींची मदत जाहीर केली आहे. तिथे अडकलेल्या राज्यातल्या प्रवाशांना राज्य सरकारतर्फे मदत पुरवण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातील अतिरिक्त निवासी आयुक्त प्रदीप कुमार यांच्या नेतृत्वाखाली एक पथक डेहरादूनला रवाना करण्यात आलंय. या कार्यालयातून महाराष्ट्रातल्या यात्रेकरूंना योग्य ती मदत केली जाणार आहे. अडकलेल्या प्रवाशांना मदत आणि माहितीसाठी हेल्पलाईनही सुरू करण्यात आल्या आहेत.

हेल्पलाईन

  • प्रदीप कुमार- 09868140663
  • जगदीश चंद्र उपाध्याय – 09818187793
  • मंत्रालयातही सुरू करण्यात आलंय आपत्कालीन व्यवस्थापन केंद्र
  • 022 – 22027990 – 022 – 22816625 – 022 – 22854168

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2013 02:57 PM IST

ताज्या बातम्या