मंत्रिमंडळ फेरबदलाचा फुसका बार, गावितांकडे सामाजिक न्याय

मंत्रिमंडळ फेरबदलाचा फुसका बार, गावितांकडे सामाजिक न्याय

 • Share this:

shapathनवी दिल्ली 17 जून : यूपीए-2 सरकारमध्ये आणखी एक मंत्रिमंडळ फेरबदल करण्यात आला. पण, हा फेरबदल बघता काँग्रेसकडे फारसे पर्यायच नव्हते, असंच दिसतंय. वयोवृद्ध असल्याने 4 वर्षांपूर्वी कॅबिनेट मंत्रिपद गमवावं लागलेल्या 85 वर्षांच्या सिस राम ओला यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळालंय. राजस्थानमध्ये होणारी विधानसभा निवडणूक बघता जाट समाजाच्या या नेत्याला पुन्हा संधी देण्यात आलीय. त्याचप्रमाणे नॉन परफॉर्मर म्हणून मंत्रिपदावर पाणी सोडावं लागलेल्या ऑस्कर फर्नांडिस यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागलीय.

चार कॅबिनेट आणि चार राज्यमंत्र्यांचा शपथग्रहणविधी आज पार पडला. शपथविधीला सुरुवात झाली कॅबिनेट मंत्री सिसराम ओला यांच्यापासून... सिसराम ओला यांनी तिसर्‍यांदा कॅबिनेट मंत्रीची जबाबदारी आली. याशिवाय गिरिजा व्यास, ऑस्कर फर्नांडीस आणि के एस राव यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ देण्यात आली.

तर महाराष्ट्राच्या वाट्याला एकच मंत्रीपद आलं. माणिकराव गावित यांनी राज्य मंत्रीपदाची शपथ घेतली. याशिवाय जे डी सिलम, ई एन एस नच्चप्पन आणि संतोष चौधरी यांनाही राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली.

राजस्थानच्या आणखी एक खासदार गिरीजा व्यास यांना पक्षनिष्ठेचं बक्षीस देण्यात आलंय. तर आंध्र प्रदेशातून पाच जणांना मंत्रिपद दिलं असूनही के. एस. राव यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलाय. राज्यमंत्रीपदी वर्णी लागलेल्यांमध्येही फार आशादायी चित्र नाही.

कर्नाटक मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत पराभूत झालेले मल्लिकार्जुन खरगे यांची नाराजी रेल्वे मंत्री पद देऊन दूर करण्यात आलीय. यूपीए दोन सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकाळातले हे पाचवे रेल्वे मंत्री... यावरूनच पक्षात किती अस्वस्थता आहे, हे स्पष्ट होतं.

पायाभूत सुविधांच्या खात्यांचे मंत्री बदलतानाही काँग्रेसने या मंत्रिमंडळात प्राधान्य दिलंय ते पक्ष हिताला. त्यामुळे गवर्हनंस पेक्षा राजकीय संदेश आणि संकेत काय जातात, याचीच काँग्रेसला आता चिंता उरलीय, हे या मंत्रिमंडळ विस्तारातून स्पष्टपणे दिसून आलंय.

 

मनमोहन सिंग यांची नवी टीम

 • सिस राम ओला : कामगार आणि रोजगार मंत्री
 • के. एस. राव : वस्त्रोद्योग मंत्री
 • गिरीजा व्यास : गृहनिर्माण, नागरी विकास आणि दारिद्र्य निर्मूलन
 • ऑस्कर फर्नांडिस : रस्ते आणि महामार्ग विकास
 • माणिकराव गावित : सामाजिक न्याय राज्यमंत्री
 • जे. डी. सीलम : अर्थ राज्यमंत्री
 • ई. एम. एस. नचीअप्पन : वाणिज्य राज्यमंत्री
 • संतोष चौधरी : आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री

भाजपनं नरेंद्र मोदींसारख्या तरूण नेत्याकडे प्रचार प्रमुख पदाची धुरा दिल्यानंतर काँग्रेसही यंग ब्रिगेड देईल आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात काही तरूण चेहरे दिसतील, अशी अपेक्षा होती. पण, ती आशा फोल ठरली. लोकसभा निवडणुकी पूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ फेरबदलात सर्वच मंत्री हे 'सीनिअर सिटीजन' आहेत.

काँग्रेसचे 'वयोवृद्ध' मंत्री

 • सिस राम ओला : 85 वर्षं
 • ई. एम. एस. नचिअप्पन : 65 वर्षं
 • ऑस्कर फर्नांडिस : 72 वर्षं
 • गिरीजा व्यास : 66 वर्षं
 • माणिकराव गावित : 78 वर्षं
 • के. एस. राव : 69 वर्षं
 • संतोष चौधरी : 68 वर्षं
 • जे. डी. सीलम : 59 वर्षं

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 17, 2013 06:59 PM IST

ताज्या बातम्या