Elec-widget
  • नक्षलवाद्यांचा हल्ला

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Jun 13, 2013 03:38 PM IST | Updated On: Jun 13, 2013 03:38 PM IST

    बिहार 13 जून : छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या यात्रेवर नक्षलवाद्यांच्या हल्ल्याला महिना उलटत नाही पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी डोकंवर काढलंय. यावेळी बिहारमधील जमुई स्टेशनवर धनबाद-पाटणा इंटरसिटी एक्स्प्रेसवर नक्षवाद्यांनी हल्ला चढवलाय. या हल्ल्यात 2 जण ठार झाले असून 5 जण जखमी झाले आहे. 100 नक्षलवाद्यांनी ट्रेनला घेरून बेछूट गोळीबार केलाय. जखमींममध्ये ट्रेनचा ड्रायव्हर आणि आरपीएफच्या 2 जवानांचा समावेश आहे. जवळपास दोन तास ही चकमक सुरू होती. आता ही ट्रेन कीऊलला पोचलीय. या हल्ल्यात सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळतीय. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारनं 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केलीय. तसंच आरपीएफच्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना नोकरीसुद्धा दिली जाणार आहे. तर गंभीर जखमींना 1 लाख रुपये दिले जाणार आहेत. बिहारच्या डीजीपींनी दिलेल्या माहितीनूसार नक्षलवाद्यांनी रेल्वेमध्ये असलेल्या आरपीएफच्या जवानांचे शस्त्रात लुटण्यासाठी हल्ला चढवला. धनबाद-पाटणा इंटरसिटी एक्स्प्रेस जमुई स्टेशनवरून रवाना झाली. इंटरसिटी एक्स्प्रेस दुपारी एकच्या सुमारास भालुई स्टेशनजवळ पोहचली असता अगोदरच दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी हल्ला चढवला. बेछूट गोळीबार करत रेल्वे रोखण्यात आली. यावेळी जवळपास 100 नक्षवाद्यांनी हल्ला केल्याचं सांगण्यात येतं आहे. या गोळीबारात आरपीएफचा एक जवान शहीद झाला असून मोटरमन गंभीर जखमी झालाय. नक्षलवाद्यांनी आरपीएफ जवानांची शस्त्र हिसकावून घेण्याचा प्रयत्नही केला. हल्ल्याची माहिती कळताच तात्काळ सीआरपीएफच्या जवानांच्या दोन तुकड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. या घटनेची संपूर्ण माहिती केंद्रीय गृहमंत्राल्याने मागवलीय. या हल्ल्यात सर्व प्रवासी सुरक्षित आहे. मागील महिन्यात नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या यात्रेवर प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात काँग्रेस नेत्यांसह 29 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी देशभरात हल्ले करू अशी धमकी दिली होती. सद्या भालुई स्टेशनचा जवानांनी ताबा घेतला आहे आणि सावधगिरीचा उपाय म्हणून हावडा-दिल्ली मार्गावरच्या ट्रेन थांबवण्यात आल्या आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Listen to the latest songs, only on JioSaavn.com