• होम
  • व्हिडिओ
  • घोटाळेखोर मंत्र्यांवर गुन्हे दाखल करा अन्यथा आंदोलन - अण्णा
  • घोटाळेखोर मंत्र्यांवर गुन्हे दाखल करा अन्यथा आंदोलन - अण्णा

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Mar 25, 2012 03:59 PM IST | Updated On: Mar 25, 2012 03:59 PM IST

    25 मार्चवेगवेगळ्या घोटाळ्यात, आरोपात दोषी असलेल्या मंत्र्यांवर गुन्हे दाखल करा अन्यथा येत्या ऑगस्ट महिन्यात रामलीला मैदानावर मोठे आंदोलन करणार तसेच देशभर जेल भरो आंदोलनही करणार असल्याचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला. 2014 च्या निवडणुकीपर्यंत लोकपाल विधेयक आणा अन्यथा चालते व्हा असाही इशारा अण्णांनी दिला. त्याचबरोबर 'राईट टू रिजेक्ट' आणि 'राईट टू रिकॉल' साठी यापुढे मोठा लढा उभा करणार असल्याचे अण्णांनी जाहीर केलं. दिल्लीत जंतरमंतर येथील एक दिवशीय उपोषण अण्णांनी सोडले. यावेळी त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या समर्थकांचे आभार मानले.जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी आज पुन्हा एकदा दिल्लीच्या जंतरमंतर येथे उपोषण करुन सरकारला इशारा दिला. मागिल वर्षी म्हणजे अडीच महिन्यांपुर्वी डिसेंबर महिन्यात अण्णांनी मुंबईत आंदोलन केलं पण तब्येत ठीक नसल्यामुळे आंदोलन मागे घ्यावे लागले. मध्यप्रदेशमध्ये आयपीएस अधिकारी नरेंद्र कुमार यांची ट्रक्टर खाली चिरडुन हत्या करण्यात आली याचा निषेध करत नरेंद्रकुमार यांना न्याय मिळावा यासाठी अण्णा हजारे आणि टीम अण्णांनी एक दिवसीय आंदोलन केलं. नेहमी प्रमाणे राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेऊन अण्णांनी उपोषणाला सुरुवात केली यावेळी सरकार मुकबधीर झालंय त्यांना शहिदांच्या बायका-पोरांचं रडण ऐकू येत नाही असा आरोप केला. तर टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी 14 मंत्र्यांवर जाहीर आरोप केले. तसेच या मंत्र्यांची यादी आरोपसह वाचून दाखवली. यामध्ये पी.चिदंबरम, कपिल सिब्बल, शरद पवार यांचा उल्लेख करण्यात आला. हाच धागा पकडून अण्णा हजारे यांनी उपोषणाची सांगता करते वेळी सरकारला इशारा दिला. येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत या दोषी मंत्र्यांवर एफआयआर दाखल करा अन्यथा रामलीला मैदानावर मोठे आंदोलन करणार तसेच यासाठी देशभर जेल भरो आंदोलन करणार असल्याचा इशारा अण्णांनी दिला. यासाठी देशभर दौरा करणार आहे राज्या-राज्यात जाऊन लोकांना जागृत करणार असंही अण्णांनी जाहीर केलं. तर 'राईट टू रिजेक्ट' कायदा आणला पाहिजे निवडणुकांमध्ये गुन्हेगार वृत्तीचे लोक निवडून येतात यांना रोखण्यासाठी जनतेला राईट टू रिजेक्ट आणि राईट टू रिकॉल अधिकार दिला पाहिजे यासाठी मोठा लढा उभा करणार आहे. या गुंड लोकांना निवडून जाता कामा नये आपण चोरालाच तिजोरीची चावी कशी देणार असा सवाल अण्णांनी जनतेला विचारला. त्याचबरोबर आज प्रजासत्ताक दिन साजरा करतोय पण जनता प्रजासत्ताक आहे कुठे ? आजही आपण पारतंत्र्यात जगत आहोत आज कोणतेही कायदे करण्याचे सरकार विसरले आहे. राजकीय पक्ष उद्योजकांकडून 20 हजारांची देणगी घेतात ही वीस हजाराची देणगी कुठे ही दाखवण्याचा कायदा नाही म्हणून करोडो रुपयांचा निधी घेऊन हे लोक वीस हजारात तुकडे तुकडे करून दाखवून ब्लॅक मॅनी व्हाईट करतात असा आरोपही अण्णांनी केला. तसेच सत्तेचे केंद्र मुंबई आणि दिल्ली झाले आहे. दुसरीकडे देशावर कर्जाचा बोजा करून ठेवला आहे आणि त्याचे व्याज फेडण्यासाठी आता कर्ज घेण्याची नामुष्की आली आहे हे रोखले पाहिजे यासाठी सरकारने पाऊलं उचलेले पाहिजे पण सरकार झोपले आहे. यामुळे यापुढे यांना कोणतेही पत्र,मागणी करणार नाही यांचे नाक दाबले की हे बरोबर तोंड उघडतात असं आंदोलन करणार असंही अण्णा म्हणाले. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व समर्थकांचे अण्णांनी आभार मानले. केजरीवाल यांनी कोणत्या मंत्र्यांवर आरोप केले ?1) पी. चिदंबरम, गृहमंत्री - टू जी घोटाळा प्रकरणात नाव- चिदंबरम वित्तमंत्री असताना भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या एका उद्योजकाचं वकीलपत्र चिदंबरम यांच्या पत्नीनं घेतलं2) अजित सिंग, हवाई वाहतूक मंत्री- यूपीए 1 च्या काळात विश्वासदर्शक ठरावावेळी लाच घेऊन सरकारला मतदान3) फारुख अब्दुल्ला, अपारंपरिक ऊर्जा मंत्री- जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या दोन खजिनदारांनी केला भ्रष्टाचार आरोप - पक्ष कार्यकर्त्याच्या खून प्रकरणात नाव4) टी. के. वासन, जहाज बांधणी मंत्री- मीठागारांसाठी 16 हजार एकर जमीन अत्यल्प किंमतीत भाडेपट्टीवर दिल्याचा आरोप5) कमलनाथ, नागरी विकास मंत्री- तांदूळ निर्यात घोटाळाप्रकरणी आरोप- विश्वासदर्शक ठरावावेळी खासदारांना लाच दिल्याचा आरोप6) कपिल सिब्बल, दूरसंचार मंत्री- रिलायन्सला 650 कोटींचा दंड होता, सिब्बलांच्या मध्यस्थीमुळे तो केवळ 5 कोटीवर आणण्यात आल्याचा आरोप7) शरद पवार, कृषीमंत्री- मुद्रांक घोटाळा प्रकरणात तेलगीनं घेतलं नाव- गहू आयात प्रकरणी घोटाळा केल्याचा आरोप- कृष्णा खोरे विकास योजनेतील जमीन स्वस्तात पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना मिळाल्याचा आरोप8) श्रीप्रकाश जैस्वाल, कोळसामंत्री- 11 लाख कोटींच्या कोळसा खाण वाटप घोटाळ्यात नाव9) सुशीलकुमार शिंदे, ऊर्जामंत्री- आदर्श घोटाळा प्रकरणी आरोप10) विलासराव देशमुख, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री- आदर्श घोटाळा प्रकरणी आरोप- सुभाष घईंना फिल्मसिटी बनवण्यासाठी अत्यल्प किंमतीत जमीन दिल्याचा आरोप- कर्जबाजारी शेतकर्‍याची पिळवणूक करणारे आमदार सानंदा यांना पाठिशी घातल्याप्रकरणी कोर्टाचे ताशेरे11) एम. के . अलागिरी, केमिकल अँड फर्टिलाईझर मंत्री- मारामारी, गुंडगिरीचे आरोप- जमीन घोटाळ्याचा आरोप12) वीरभद्र सिंग, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री- माजी आयपीएस अधिकार्‍याकडून लाच मागितल्याचा आरोप 13) एस. एम. कृष्णा, परराष्ट्र मंत्री- कर्नाटकातल्या खाण घोटाळा प्रकरणी थेट आरोप14) प्रफुल्ल पटेल, भारी उद्योग मंत्री- वाहतूक मंत्री असताना आवश्यकता नसतानाही विमान खरेदीचा आरोप- एका करारात 2.50 लाख डॉलरची लाच घेतल्याचा आरोप

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी