कार्ला (गोवा), 27 मार्च : लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या कुळाचाराप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सहकुटुंब कार्ला येथील एकवीरा देवीचं दर्शन घेतलं. एकवीरा देवी ठाकरे कुटुंबीयांची कुलदैवत आहे. मोठ्या निवडणुकीपूर्वी आणि निवडणूक निकालांनंतरही ठाकरे कुटुंब विजयी उमेदवारांना घेऊन कुलदैवत एकवीरा देवीचा आशिर्वाद घेण्यासाठी दर्शनाला येतात. बुधवारी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवार दर्शनासाठी आले होते. आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं त्यांनी देवीकडे काय मागितलं असावं? अशी चर्चा राजकीय गोटात आहे.