आठव्या टप्प्यात विक्रमी मतदान

आठव्या टप्प्यात विक्रमी मतदान

  • Share this:

930aprilvoting_pbangal07 मे :लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्यात आज  सात राज्यांत 64 जागांसाठी मतदान संपलं. जम्मू आणि काश्मिरमध्ये ग्रेनेड हल्ल्याची घटना वगळता इतरत्र शांतेत मतदान पार पडलं. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 81 टक्के इतकं विक्रमी मतदान झालं.

तर विभाजनानंतर पहिल्यांदाच आंध्रप्रदेशमध्ये सीमांध्र भागात मतदान पार पडलं. लोकसभेच्या पहिल्या मतदानाला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सीमांध्र भागात 76 टक्के मतदान झालं. त्यापाठोपाठ बिहारमध्ये 58, अमेठीत 54.24 टक्के मतदान झालं तर उत्तराखंडमध्ये 62, हिमाचलप्रदेशमध्ये 65, उत्तरप्रदेशमध्ये 56 टक्के मतदान झालं.

दहशतवादाच्या सावटाखाली असलेल्या जम्मू आणि काश्मिरमधील लडाख आणि बारामुल्ला इथं मतदारांनी दहशतवादाच्या नाकावर टिचून मतदानाची 'फिफ्टी' साजरी केली. मतदान प्रक्रियेत अडथळा आणण्यासाठी सकाळी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. पण मतदारांनी न घाबरता मतदानाचा हक्क बजावला लडाख आणि बारामुल्ला इथं 50 टक्के मतदान झालं. एकूण नऊ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून आज आठवा टप्पा संपला आहे. आता अखेरच्या आणि निर्णायक नव्या टप्प्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अमेठीमध्ये अत्यंत चुरशीची लढत

उत्तरप्रदेशमधल्या अमेठीमधली लढत अत्यंत चुरशीची आहे. राहुल गांधी विरुद्ध भाजपच्या स्मृती इराणी विरुद्ध आपचे कुमार विश्वास यांच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. 15 जागांवर ही निवडणूक होतेय. काँग्रेससमोर 2009 च्या 7 जागा कायम ठेवण्याचं आव्हान आहे. अमेठीतल्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींनी जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे मायावती मोदींचा वारु रोखणार का? हा उत्सुकतेचा मुद्दा आहे.

आंध्रात निवडणुकीचा शुभारंभ

तर आंध्रप्रदेशसाठी ही निवडणूक ऐतिहासिक असणार आहे कारण, आंध्रच्या विभाजनानंतर पहिल्यांदाच सीमांध्र भागात लोकसभा निवडणूक होतेय. जगन रेड्डी, चंद्राबाबू नायडू, यांच्यात प्रमुख लढत आहे. सामक्य आंध्र पक्ष आणि भाजप यांना सीमांध्रमध्ये काही यश मिळणार का? याबद्दल उत्सुकता आहे. नव्या राज्यात सत्ता मिळवण्यासाठी जगन रेड्डी आणि चंद्राबाबू यांच्यात प्रमुख लढत असणार आहे. चंद्राबाबूच्या मदतीचा भाजपला फायदा होणार की तेलंगणाला पाठिंबा देणार्‍या भाजपसोबतच्या युतीनं चंद्राबाबूंचं नुकसान होणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

हिमाचलमध्ये वीरभद्र सिंग यांची प्रतिष्ठापणाला

हिमाचल प्रदेशमध्ये सर्वच्या सर्व म्हणजे 4 मतदारसंघात निवडणूक होतेय. काँग्रेसच्या वीरभद्र सिंग यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. वीरभद्र यांच्या पत्नी प्रतिभा सिंग मंडी मतदारसंघातून रिंगणात आहेत. इथे भाजपसमोर संख्याबळ वाढवण्याचं आव्हान आहे. भाजयुमोचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना हमीरपूर मतदारसंघात कडवी लढत दयावी लागतीये.

 उत्तराखंडमध्ये भाजपकडून 3 माजी मुख्यमंत्री रिंगणात

उत्तराखंडमध्ये भाजपकडून 3 माजी मुख्यमंत्री रिंगणात आहेत. भगतसिंह कोशियारी, बी सी खंडुरी आणि रमेश पोखरीयाल निशंक हे तीन मुख्यमंत्री आपलं नशीब आजमावत आहेत. तर हरिद्वार मतदारसंघातही कडवी लढत पाहायला मिळेल. हरिद्वारमध्ये मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या पत्नी रेणुका विरुद्ध भाजपचे रमेश पोखरियाल यांच्यात कडवी लढत आहे.

पश्चिम बंगालमध्ये ममता विरुद्ध कम्युनिस्ट

पश्चिम बंगालमध्ये बीरभूम, बांकुरा या कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात मतदान होणार आहे. सीपीएमच्या बासुदेव आचार्य यांच्याविरुद्ध तृणमूलतर्फे अभिनेत्री मुनमुन सेन ही सर्वात रंगतदार लढत असणार आहे. ममता विरुद्ध कम्युनिस्ट लढतीचा भाजपला फायदा होणार का? हेदेखील पाहण्यास मिळेल.

 

First published: May 7, 2014, 8:44 PM IST

ताज्या बातम्या