13 मार्च : केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडचा संरक्षण खात्याचा कार्यभार अरुण जेटली यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. आता अरुण जेटली यांच्याकडे अर्थमंत्रालयासोबतच संरक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार असेल.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मनोहर पर्रिकर यांचा राजीनामा स्वीकारला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सांगण्यानुसारच राष्ट्रपतींनी अरुण जेटलींना संरक्षण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारण्याच्या सूचना दिल्या. राष्ट्रपती कार्यालयाने याबदद्लचं अधिकृत पत्रक काढलंय.
2014 मध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर अरुण जेटलींकडे अर्थमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. नंतर नोव्हेंबर 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी मनोहर पर्रिकर यांना गोव्याहून दिल्लीला बोलवलं आणि त्यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी दिली.
संरक्षणमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांच्यासमोर मोठी आव्हानं होती. काश्मीरमधले दहशतवादी हल्ले रोखण्याच्या कसोटीलाही ते सामोरे गेले. सर्जिकल स्ट्राईकनंतर मनोहर पर्रिकर यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे ते वादातही सापडले होते.
मनोहर पर्रिकर यांच्या राजीनाम्यानंतर आता ही आव्हानं अरुण जेटली यांच्यासमोर असणार आहेत. अर्थमंत्री आणि संरक्षणमंत्री म्हणून अरुण जेटलींवर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी आलीय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा