आम्हाला मतदान केलं किंवा नाही केलं हे त्यांचंही सरकार -मोदी

आम्हाला मतदान केलं किंवा नाही केलं हे त्यांचंही सरकार -मोदी

  • Share this:

narendra_modi4312 मार्च :  ज्या झाडाला जास्त फळं येतात ते झाड वाकलेलं असतं हा निसर्गाचा नियम आहे. आणि आता या विजयामुळे आपल्या नम्र होण्याचा नियम लागू होतोय असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या नेत्यांना नम्रपणे वागण्याचा मूलमंत्र दिलाय. तसंच त्यांनी नव्या भारताचा नाराही दिला.

उत्तरप्रदेश, उत्तराखंडमध्ये घवघवीत यशानंतर नवी दिल्लीत भाजपने विजयी जल्लोष साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ली मेरिडियन हॉटेलपासून रोड शो निघाला. त्यानंतर भाजप मुख्यालयात पृष्पवृष्टीत मोदींचं जंगी स्वागत करण्यात आलंय. त्यानंतर मोदींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. भाषणाच्या सुरुवातील त्यांनी  देशवासीयांना होळीच्या शुभेच्छा दिल्यात. निवडणुकीत विजय मिळण्याची अनेक कारणं असतात. आतापर्यंत विकासाचा मुद्दा घेऊन विरोधक निवडणूक लढण्यास घाबरत होते. पण आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन लोकांसमोर गेलो. कोणताही भावनिक मुद्दा नसतानाही लोकांनी भरभरून मतदान केलं. अविश्वसनिय पद्धतीनं मिळणारा विजय हा राजकीय तज्ज्ञांना विचार करायला लावणारी गोष्ट आहे असा टोला मोदींनी  राजकीय तज्ज्ञांना लगावला.

आम्ही कुणाला हरवलं याचा मी विचार करत नाही. आणि यात मी पडत सुद्धा नाही. भाजपचा विजय हा जनतेनं दिलेला आदेश आहे, त्यांच्या आदेश आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपल्याला लोकांची काम करावीच लागणार आहे. असं सांगत या निवडणुकाचे निकाल हे आमच्यासाठी भावनिक मुद्दाही आहे. कारण हे वर्ष पंडित दिन दयाल उपाध्याय यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. उत्तर प्रदेश ही दिनदयाल उपाध्यायांची कर्मभूमी होती. म्हणून हा विजय म्हणजे त्याचा आशिर्वाद आहे अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

हा विजय सहज मिळाला नाहीये. अनेक पिढ्यांनी मेहनत केलीये, त्याचचं हे फळ आहे. आज जनतेच्या आशा-आकांक्षांचं प्रतिक म्हणून आम्ही पुढे आलोय. गरिबांना कामाची संधी मिळाली तर तो बदल घडवून दाखवेल, गरीब हाच या देशाची ताकद आहे. त्यांच्यासाठी हा आपला लढा आहे असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

मला नवा भारत दिसत आहे. त्यासाठी आपल्याला पुढे जायचंय आहे. पक्षाच्या इतिहासातला हा सुवर्णक्षण आहे. हा सुवर्णक्षण अचानक मिळालेला नाही, त्यासाठी चार-चार पिढ्यांनी मेहनत केलीये. आम्हाला वडिलोपार्जित काही मिळालेलं नाही असं म्हणत त्यांनी गांधी घरण्याचा उल्लेख टाळत टोला लगावला.

देशासाठी काही करायला मिळेल हे स्वप्न घेऊन निघालेलो आहोत. आपला सर्वात महत्वाचा टप्पा आहे 2022. मी निवडणुकांचा विचार करत नाही. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होतील. पाच वर्षात प्रत्येकानं देशाच्या विकासासाठी पुढं आलं पाहिजे.  विकासाचा संकल्प जर प्रत्येकानं केलं तर देशाचा विकास कोणीही रोखू शकत नाही. आपल्याला नवा भारत निर्माण करायचा असा नारा यावेळी मोदींनी दिला.

भाजपवर तुम्ही जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. जनतेनं नवीन लोकांना संधी दिलीये. जे कधी टिव्हीवर आले नाही अशा प्रतिनिधींना तुम्ही निवडून दिलंय. पण काम करण्यात आम्ही कोणतीही कसुर करणार नाही. नवीन गोष्टी शिकाव्या लागणार आहेत त्या शिकून आम्ही काम करू अशी ग्वाहीही मोदींनी दिली.

आम्ही नवीन आहोत अनूभव पण कमी आहे. आमच्याकडून चुका होऊ शकता पण चुकीच्या विचाराने कोणतंही काम करणार नाही. जे काही करणार ते प्रामाणिकपणे करणार असं सांगत त्यांनी 2014 च्यावेळी भाजपची सूत्रहाती घेताना आठवणींना उजाळा दिला.

सरकार बनते बहुमताने पण ते चालते सार्वमताने, हा विजय ज्यांनी मतदान केलं त्यांचा आहे आणि ज्यांनी केलं नाही त्यांचापण आहे. पण आता आपल्याला नवीन भारत बनवण्यासाठी काम करायचंय असं म्हणत पंतप्रधान मोदींनी भाषणाचा शेवट केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 12, 2017, 6:30 PM IST

ताज्या बातम्या