S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

उत्तर प्रदेशात विजय कुणाचा ? भाजपची होणार का सरशी ?

Sachin Salve | Updated On: Mar 6, 2017 08:33 PM IST

up_election06 मार्च : उत्तर प्रदेश निवडणुकीचा प्रचार आज संपतोय. आता 8 मार्चला मतदानाचा आठवा टप्पा झाल्यानंतर 11 मार्चला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. पण जसजसा निकालाचा दिवस जवळ येतोय तसेतसे अनेक पातळीवर तर्क लढवले जातायत. भाजप, समाजवादी पक्ष आणि मायावतींच्या बसपमध्ये इथे चुरशीची लढत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये नेमकं जिंकणार कोण याचे अंदाज वर्तवणं कठीण आहे. या महाकाय राज्याचे मतदार कुणाला कौल देतात याबद्दलची उत्सुकता आता शिगेला पोहोचलीय.

उत्तर प्रदेशच्या निकालांचं भाकित सांगण्यासाठी सगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये चढाओढ सुरू आहे. उत्तर प्रदेशचा दौरा करून आलेले पत्रकार आणि संख्याशास्त्रज्ञ हिरिरीने आपली मतं मांडतायत आणि निष्कर्षापर्यंतही येऊन पोहोचलेत. उत्तर प्रदेशमधली निवडणुकीची समीकरणं पाहता आपण वर्तवलेला अंदाज अचूक आहे, असाही त्यांचा दावा आहे.

एनडीटीव्हीचे ज्येष्ठ पत्रकार प्रणय रॉय यांच्या अंदाजानुसार, उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या विजयाची शक्यता जास्त आहे.  भाजपच्या विजयाची शक्यता 55 ते 65 टक्के आहे, असा त्यांचा अंदाज सांगतो. त्याखालोखाल समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या आघाडीचा क्रमांक लागतो. समाजवादी आणि काँग्रेसच्या विजयाची शक्यता 30 ते 40 टक्क आहे. मायावतींचा बहुजन समाज पक्ष तिसऱ्या स्थानावर आहे आणि त्यांच्या विजयाची शक्यता फारच कमी म्हणजे अगदी 10 टक्के आहे, असा या आकडेवारीचा निष्कर्ष आहे.पत्रकार, राजकीय निरीक्षक आणि संख्याशास्त्रज्ञ या शक्यता वर्तवत असले तरी उत्तर प्रदेशचे मतदार नेमका कशा पद्धतीने कौल देतील हे अगदी अचूकरित्या सांगता येत नाही हेही सांगायला तज्ज्ञ विसरलेले नाहीत. उत्तर प्रदेशमधले मागासवर्गीय आणि दलित मतदार कुणाला मतं देतील हे अजून कळू शकलेलं नाही. हे मतदार फारसा गाजावाजा न करता किंवा आपली मतं ठासून न मांडता थेट मतपेटीमध्येच आपलं मत नोंदवतात. त्यामुळे या मतदारांच्या मतदानावरही निकाल अवलंबून आहे.

खास करून पूर्व उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांची समीकरणं जातीपातीवरच ठरतात. त्यामुळे जातव समुदायासह आणखी मागासवर्गीय मतदार कुणावर निष्ठा दाखवणार यावर या निवडणुकीचा निकाल ठरू शकतो.

भाजपला लोकसभा निवडणुकीत 42 टक्के मतं मिळाली. लोकसभेच्या 80 जागांपैकी भाजपला 73 जागा मिळाल्या होत्या. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेसाठी भाजपच्या मतांमध्ये घट झाली तरीही भाजपचं मोठं नुकसान होणार नाही, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

मतदारांचा कौल भाजपच्या बाजूने दिसत असला तरी भाजपने मात्र उत्तर प्रदेशच्या मतदारांना अजिबात गृहित धरलेलं नाही. मोदी लाटेचा परिणाम अजूनही टिकून आहे पण या लाटेत वाहून जाण्याची चूक भाजपला करायची नाहीये. बिहारमध्ये भाजपचा पराभव झाला तसा फटका इथे बसू नये म्हणून भाजप सगळ्या प्रकारची सावधगिरी बाळगतंय.

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशात तळ ठाकून आहेत. पूर्व उत्तर प्रदेश आणि खास करून वाराणसीमध्येही जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. समाजवादी पक्ष,बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसला धडा शिकवा आणि भाजपलाच निवडा, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय. त्यांच्या या आवाहनाला मतदार कसा प्रतिसाद देतायत हे 11 मार्चलाच कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 6, 2017 08:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close