S M L

युपीच्या आखाड्यात प्रियांका गांधी काँग्रेसच्या स्टार कँपेनर

Sachin Salve | Updated On: Jan 24, 2017 09:59 PM IST

priyanka_gandhi3अजय कौटिकवार, मुंबई

24 जानेवारी : उत्तरप्रदेश निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेसमध्ये युती झाली आणि भाजपला धक्का बसला. या सपा-काँग्रेस युतीमध्ये सर्वात मोठा वाटा प्रियांका गांधींचा आहे, असं काँग्रेसकडून सांगितलं जातंय. त्यातच भर म्हणजे काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतही प्रियांका गांधींचं नाव आहे. त्यामुळं प्रियांका आता संपूर्ण उत्तर प्रदेशात प्रचार करणार हे स्पष्ट झालंय. प्रियांका गांधींच्या या सक्रियतेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलाय तर विरोधकांमध्ये धडकी भरली आहे. पण प्रियांका गांधींची ही सक्रियता काँग्रेसला उत्तर प्रदेशात तारेल का हाच खरा प्रश्न आहे.

प्रियांका गांधींमुळेच युती ?


उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत आघाडी करण्यासाठी काँग्रेस आतुर होती. ही आतुरता एवढी होती की काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार शीला दीक्षित यांनी माझ्यापेक्षा अखिलेश जास्त योग्य आहे, असंही सांगून टाकलं. निवडणूक आयोगाने सायकल हे चिन्ह अखिलेश गटाकडे दिलं आणि खरी बोलणी सुरू झाली. मात्र अखिलेश शेवटपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांना दाद देत नव्हते. शेवटी काँग्रेसने आपला हुकूमी एक्का बाहेर काढला आणि प्रियांका गांधींनी थेट अखिलेश यादव यांच्याशी बोलणी केली. अखिलेश यादव यांच्या पत्नी डिम्पल आणि प्रियांकांच्या मैत्रीमुळेही हा मार्ग सुकर झाल्याचं बोललं जातंय. शेवटी एकूण 403 जागांपैकी 105 जागा काँग्रेसला मिळाल्या तर 298 जागांवर समाजवादी पक्ष रिंगणात उतरणार आहे.

राहुल गांधी कुठे आहेत?

राहुल गांधी आणि अखिलेश यांच्यात चांगली मैत्री आहे. असं असतानाही प्रियांका गांधींचं नाव पुढं का केलं जातं यावर अनेक तर्क लावले जातायत.  काँग्रेसमधल्या ज्येष्ठ नेत्यांनी जाणीवपूर्वक प्रियांकांचं नाव पुढे केल्याची दिल्लीत चर्चा आहे. जुने नेते आणि राहुल गांधी यांचं फारसं जमत नाही. त्यामुळे राहुल यांना अध्यपद स्वीकारण्यास विलंब होत असल्याचंही दिल्लीत बोललं जातंय. हा जुन्या - नव्याचा संघर्ष राहुल गांधींसाठी अडसर ठरलाय. सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी उत्तर प्रदेशमध्ये आघाडी होण्यामागे प्रियांका गांधींची मोठी भूमिका आहे, असं ट्विट केलं. प्रियांका गांधींचं नेतृत्व वरचढ दाखवण्यासाठीच पटेल यांनी ट्विट केलं का? असा प्रश्नही काँग्रेसमध्ये विचारला जातोय. राहुल गांधींच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यासाठीच ज्येष्ठ नेत्यांचा हा डाव असल्याचीही चर्चा आहे.

Loading...

राहुल की प्रियांका?

काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रियांकांमध्ये इंदिरा गांधींचं रूप दिसतं, त्यामुळेच लोकसभेतल्या पराभवानंतर दिल्लीत `प्रियांका लाओ, काँग्रेस बचाओ` असे होर्डींग्ज लागले होते. राहुल गांधींनी पक्षात सक्रिय होऊन आता दशकापेक्षा जास्त काळ लोटून गेला तरी ते फ्रंट फूटवर खेळण्यास तयार नाहीत. वक्तृत्व आणि राजकीय व्यवहार चातुर्यातही त्यांच्या मर्यादा स्पष्टपणे जाणवल्याने काँग्रेसमध्ये प्रियांका गांधींनी सक्रीय व्हावं,असा जोर वाढतो आहे. प्रियांका गांधींनी मात्र जाणीवपूर्वक स्वत:ला सक्रिय राजकारणापासून दूर ठेवलं. अमेठी आणि रायबरेलीबाहेर प्रचारासाठी त्या फारशा गेल्या नाहीत. यावेळी मात्र त्या संपूर्ण राज्य ढवळून काढण्याची शक्यता आहे. राहुल आता लवकरच काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारतील असं दाखवलं जात असताना प्रियांका गांधींची ही सक्रियता अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरणार आहे.

काँग्रेसला मिळेल का संजीवनी?

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची अवस्था अतिशय बिकट आहे. गावपातळीवर नेटवर्क नाही आणि राज्यात नेतृत्व नाही अशा परिस्थितीत प्रियांका गांधींची ही सक्रियता काँग्रेसला उत्तरप्रदेशात संजीवनी देईल का हा खरा प्रश्न आहे. त्याचबरोबर 2019 ची तयारी काँग्रेस करतेय, असंही राजकीय निरिक्षकांना वाटतंय. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यांच्या निवडणूक निकालाच्या वेळी 11 मार्चलाच मिळतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2017 09:59 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close