S M L

अखिलेश काँग्रेस आणि भाजपसाठीही ठरले सवाई

Sachin Salve | Updated On: Jan 23, 2017 10:01 PM IST

akhilesh-singh-yadav-010312-ma-22_650_022214103800कौस्तुभ फलटणकर ,नवी दिल्ली 

23 जानेवारी : उत्तर प्रदेशात हो - नाही म्हणत काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची आघाडी झाली. पण ही आघाडी करताना काँग्रेसची जी फरफट झाली ती बघून काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय ? हा प्रश्न निर्माण झालाय. कारण ही आघाडी करताना, आपण काँग्रेसला काही किंमत देत नाही हे अखिलेश यादव यांनी दाखवून दिलंय.

नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदासाठीची राजकीय रणनीती ठरवणारे प्रशांत किशोर हे उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसचे रणनीतीकार आहेत.  '27 साल युपी बेहाल' हा नारा देत राहुल गांधी उत्तर प्रदेश निवडणुकीत उतरले होते. काँग्रेसला उत्तर प्रदेशात पुन्हा जिवंत करण्यासाठी त्यांनी निवडणुकीच्या अगदी आधी देवरिया ते दिल्ली अशी अख्ख्या उत्तर प्रदेशची यात्राही केली.  पंतप्रधानपदाचा रस्ता उत्त्तर प्रदेशातून जातो. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्ष जिवंत झाला तर आपला फायदा होईल ही राहुल गांधींची रणनीती होती.

उत्तर प्रदेशात आपली परंपरागत ब्राम्हण व्होट बँक परत मिळावी म्हणून काँग्रेसने दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून घोषितही केलं. पण ही निवडणूक अखिलेश ,भाजप आणि बसपा अशी होणार असल्याने स्वतंत्र लढून 20 - 25 पेक्षा जास्त जागा आपल्याला मिळणार नाहीत, हे काँग्रेसच्या लक्षात आलं.

या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला अखिलेश यादव यांच्याशी युती करायचा सल्ला दिला. मुलायमसिंह यादव यांच्याशी झालेल्या वादात निवडणूक आयोगासमोर अडचणी येऊ शकतात हा विचार करून अखिलेश यादव यांनीही काँग्रेसशी युती करण्याचा निर्णय घेतला. युतीच्या पूर्ण प्रक्रियेत प्रशांत किशोर हे अखिलेश यादव यांच्या सतत संपर्कात होते.

Loading...

akhilesh_yadav4523या सगळ्या घडामोडी घडत असताना निवडणूक आयोगाने अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी आणि सायकल चिन्हाला मान्यता दिली. निवडणूक आयोगाचा दिलासा मिळताच अखिलेश यादव काँग्रेसला फारशी किंमत देईनासे झाले. अखिलेश यांनी अगदी काँग्रेसच्या न कळत समाजवादी पार्टीच्या 200 जागा घोषितही करून टाकल्या आणि काँग्रेससाठी फक्त 50 ते 60 जागा देण्याची भूमिका घेतली.

अखिलेश यादव यांच्या या पावित्र्याने काँग्रेस पक्ष पूर्णपणे हादरला. शीला दीक्षित समाजवादी पक्षासोबत युती होईल म्हणून आधीच मुख्यमंत्रिपदाचे नाव मागे घेऊन चुकल्या होत्या आणि या सगळ्या प्रक्रियेत प्रशांत किशोर आपल्याला विश्वासात घेत नाहीत असा आरोप करत ज्येष्ठ नेते नाराज होते.

ही सगळी परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे प्रियांका गांधींनी अखिलेश यादव यांच्या पत्नी डिम्पल यादव यांच्याशी बोलून अखिलेश यांचं मन वळवण्याचे प्रयत्न सुरू केले. लालूप्रसाद यादवही काँग्रेसच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी अखिलेशकडे काँग्रेससाठी आग्रह धरला. या सगळ्याच परिणाम म्हणून अखिलेश काँग्रेसला 105 जागा द्यायला तयार झाले.

akhilesh_and_Rahulअसं असलं तरी समाजवादी आणि काँग्रेसच्या आघाडीची घोषणा करण्यासाठी अखिलेश यांनी आपल्या पक्षातले दुय्यम नेते किरणमय नंदा यांना राज बब्बर यांच्यासोबत पत्रकार परिषदेत पाठवलं. इतका अपमान आणि दुय्यम वागणूक सहन करण्याची स्थिति प्रशांत किशोर आणि राहुल गांधीनी कोणालाच विश्वासात न घेतल्याने आली , असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. त्यातच काँग्रेस नेते आता या युतीचं श्रेय राहुल गांधी यांच्याऐवजी प्रियांका गांधींना देतायत.

काँग्रेसमधल्या या मतभेदांचा फायदा पुन्हा एकदा अखिलेश यादव यांनाच होऊ शकतो, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. अखिलेश यादव यांनी काँग्रेसशी युती करून भाजपला मोठा धक्का दिलाय. त्यातच आता ते काँग्रेसलाही दुय्यम वागणूक देतायत. समाजवादी पक्षामधल्या वादात मुलायमसिंह यांनाही त्यांनी धोबीपछाड दिला. त्यामुळे बाप से बेटा सवाई तर आहेच पण आता अखिलेश काँग्रेस आणि भाजपसाठीही सवाई ठरलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 23, 2017 10:00 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close