06 जानेवारी : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांतील घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी याचिकेद्वारे केलेली मागणी आज (शुक्रवारी) मुंबई हायकोर्टाने तूर्तास फेटाळली आहे.
कोर्टाने आपण यासंबंधित पोलीसांकडे तक्रार केली आहे का?, अशी विचारणा केली. त्यावर, अण्णांच्या वकीलांनी नाही असं सांगितल्यावर पहिले कारख संबंधित सहकारी कारखान्यांबाबत तक्रार दाखल करा, असे आदेश कोर्टाने अण्णा हजारे यांना दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी १३ फेब्रुवारीला होणार आहे.
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासारख्या काही राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचा गंभीर आरोप हजारे यांनी केला आहे. अण्णा हजारे यांनी याप्रकरणी मुंबई हायकोर्टात 2 दिवाणी आणि 1 फौजदारी याचिका दाखल केली आहे.
बँकांकडून आर्थिक सहाय्य घेऊनही साखर कारखाने जाणीवपूर्वक डबघाईला आणण्यात आले आणि त्यानंतर ते कमी किंमतीमध्ये विकण्यात आले. या सर्व अनागोंदी कारभारामुळे राज्य सरकार, सहकार क्षेत्र आणि जनतेचे 25 हजार कोटींचे नुकसान झाले आहे, असा दावा अण्णा हजारेंनी यांनी केला आहे.
दरम्यान, सीबीआयमार्फत या घोटळ्याची चौकशी करावी अशी मागणी अण्णा हजारेंनी केली असून, आपण मिळवलेली आकडेवारी ही माहिती अधिकार कायद्याखाली मिळवली असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv