14 डिसेंबर : जुन्या नोटांच्या जागी 2 हजार आणि पाचशेच्या नव्या नोटा चलनात येऊन महिना उलटत नाही तोच, अनेक ठिकाणाहून नोटांची बंडलं आणि कोटीच्या कोटी रूपये मिळण्याचं सत्र आणखी वाढताना दिसतं आहे. आज सकाळपासून सीबीआय, ईडी आणि आयकर विभागानं देशभरात टाकलेल्या छाप्यातून आज 9 कोटींहून अधिक रुपये जप्त करण्यात आले. त्यात तब्बल साडेतीन कोटींच्या नव्या नोटांचा समावेश आहे.
दिल्लीच्या करोल बाग इथल्या एका हॉटेलवर टाकलेल्या छाप्यात आयकर आणि क्राइम ब्रॅंचच्या अधिकाऱ्यांना सव्वा तीन कोटी रुपयांच्या जुन्या नोटा मिळाल्या आहेत. या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. मुंबई स्थित हवाला ऑपरेटरचे हे पैसे असल्याचं प्राथमिक चौकशीतून पुढं आलं आहे.
गोव्यात 68 लाखांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. या सर्व नोटा 2 हजारांच्या आहेत. तर बेंगळुरूमधून तब्बल 2.25 कोटींच्या नव्या नोटा मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. तर आज सकाळी चंदीगडमधून 2.18 कोटी जप्त करण्यात आले आहेत. त्यात 17.51 लाखांच्या नव्या नोटा आणि ५२ लाखांच्या शंभरच्या नोटा आहेत.
दरम्यान, पुण्यातील वाकडमध्ये 67 लाखांच्या नव्या नोटा काल मध्यरात्री जप्त करण्यात आल्या आहेत. या कारमधील पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस शिपाई सुतार यांनी संशयित म्हणून थांबवलेल्या कारमधून ही रक्कम जप्त करण्यात आली. सुतार यांनी वरिष्ठांना याबाबत सांगितलं. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आलं आणि कारवाई केली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv