अभिनेत्री ते मुख्यमंत्री 'अम्मा' !

अभिनेत्री ते मुख्यमंत्री 'अम्मा' !

  • Share this:

[wzslider] 06 डिसेंबर :  वरून शांत आणि मायाळू दिसणारा चेहरा, अंतर्यामी करारी बाणा आणि वेळ आल्यास विरोधकांना लोळवण्याची वृत्ती. जयललिता जयराम म्हणजेच तामिळींच्या 'अम्मां'ची ही ओळख. सिनेमातून राजकारणात अशी परंपरा तामिळी-तेलुगु राजकारणात आहे. जयललिता त्याच परंपरेतल्या नेमका कसा आहे या अम्मांचा प्रवास..

चिन्नडा गोम्बे, वेन्निरा अडाई आणि इज्जत ही आहेत अनुक्रमे कानडी, तामिळ आणि हिंदी सिनेमांची नावं. पण हे सिनेमे साधुसुधे नाही. किमान तामिळींसाठी तर नाहीतच कारण त्यांच्या अम्मा अर्थात जयललितांच्या या डेब्यु फिल्म आहेत.

तामिळनाडूच्या राजकारणात गेली 3 दशकं आपला दबदबा कायम राखणारी ही करारी महिला. तामिळी फिल्म इंडस्ट्रीत पहिल्यांदा स्कर्ट घालून खळबळ उडवून देणार्‍या जयललितांनी त्यानंतर अनेक हिट सिनेमे देऊन 80 मध्ये चित्रपटसन्यास घेत, राजकारणात प्रवेश केला.

एमजीआर अर्थात एमजी रामचंद्रन यांच्या ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघममधून त्या राज्यसभेवर गेल्या. 88 साली जयललिता बनल्या लोकसभेच्या खासदार.

त्याचवेळी त्यांची एमजीआर यांच्याशी जवळीक वाढली आणि लवकरच एमजीआर यांच्याशी त्यांनी दुसरी पत्नी म्हणून घरोबाही केला. अर्थातच करुणानिधींच्या द्रमुकशी जोरदार संघर्ष करण्याकरता एमजीआरनी जयललितांचा वापर केला आणि एमजीआर यांच्या निधनानंतर द्रमुक विरोध हाच अम्मांच्या राजकारणाचा कळीचा मुद्दा बनला.

1989 च्या विधानसभा निवडणुकांत जयललितांना चांगलं यश मिळालं, पण सत्ता मिळू शकली नाही. विरोधी पक्षनेत्या होणार्‍या त्या पहिल्याच महिला होत्या. काँग्रेसन पाठिंबा काढल्याने त्यावेळी द्रमुक सरकार कोसळले. आणि 91 च्या निवडणुकांत मग जयललितांनी काँग्रेसबरोबर आघाडी केली.

पण दुसर्‍याच दिवशी राजीव गांधींची हत्या झाली. अर्थात सहानूभूतीच्या लाटेचा फायदा अम्मांना मिळाला आणि त्या निवडून आलेल्या तामिळनाडूच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या. मात्र 5 वर्षांच्या या कारकीर्दीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि 96 ला त्यांच्या हातातून सत्ता गेली. पण 2001 साली पुन्हा धडाक्यात त्यांनी करुणानिधींकडून सत्ता हस्तगत गेली.

द्रमुक आणि अण्णा द्रमुकचा संघर्ष वाढतच होता. एकमेकांवरचे भ्रष्टाचाराचे आरोप, सत्ता संघर्ष यातून पुन्हा द्रमुकचे करुणानिधी 2006 मध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले.

सत्ता संघर्षाच्या या 15 वर्षांच्या काळात मिळकतीपेक्षाही अधिक संपत्ती, दत्तक मुलाचं शाही लग्न यामुळे अम्मांवर टीका आणि आरोप झाले. त्यातच कोर्ट निर्णयाचा फायदा घेत करुणानिधींनी जयललितांना एका महिन्यासाठी जेलमध्येही पाठवलं होतं.

गेल्या पाच वर्षात मात्र बाजी पलटू लागल्याचीच चिन्ह दिसू लागली. द्रमुक अंतर्गतच अनेक वाद, घराणेशाहीचं राजकारण आणि गाजत असलेला 2-जी स्पेक्ट्रम घोटाळा. द्रमुकच्या सत्तेला घरघर लागण्याचीच ही नांदी होती.

त्याचाच वापर करत अम्मांनी प्रचाराची राळ उठवून दिली. आणि वैतागलेल्या तामिळी जनतेनं मग द्रमुकला खाली खेचत, जयललितांना पुन्हा सत्तेवर बसवलं.

२०१६ च्या निवडणुकीत तर मतदारांना पंखे, सायकली, टीव्ही असे मोफत बक्षीसांचं आमिष देऊन अम्मांनी प्रचाराच धुराळ उडवलं. विशेष म्हणजे तामिळनाडूमध्ये अालटूनपालटून सत्तांतर होणे हे नेहमीचे पण तामिळ जनतेनं अम्माला साथ दिली. सलग दुसऱ्यांदा आणि आतापर्यंत पाचव्यांदा मुख्यमंत्री होण्याच बहुमान अम्मांनी मिळवला. एका अभिनेत्री ते मुख्यमंत्रिपदापर्यंतच अम्माचा प्रवास थक्क करणारा असाच आहे.म्हणूनच त्या अम्मा होऊ शकल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 6, 2016, 1:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading