जयललिता यांचा प्रवास

जयललिता यांचा प्रवास

  • Share this:

 jayalalita06 डिसेंबर -  जयललिता जयराम म्हणजेच तामिळींच्या 'अम्मां'ची ही ओळख. सिनेमा ते राजकारणात असा त्यांचा प्रवास...आधी अभिनेत्री, मग आमदार, खासदार, विरोधी पक्षनेत्या आणि मग...अनेक वेळा मुख्यमंत्री. अम्मांचा जन्म 24 फेब्रुवारी 1948 साली तत्कालीन मैसूर संस्थानातला. वडील वकील आणि आई गृहिणी. आजोबा मैसूरच्या राजाचे सर्जन. घरी श्रीमंती. पण वडिलांनी सगळा पैसा आणि मालमत्ता मातीत मिळवली. ते गेल्यावर आईनं चित्रपटात अभिनय सुरू केला. तिला चेन्नईला स्थाईक व्हावं लागलं. छोटी जया आजी-आजोबांकडे मैसूरलाच राहिली. शाळेत कायम पहिला नंबर. गायन, नृत्य, निबंध लेखन आणि वक्तृत्वात कायम पुढे.

जया 16 वर्षांची झाली आणि आईनं चित्रपट क्षेत्रात शिरायला भाग पाडलं. आईला कामं कमी मिळत होती.. भावाचं शिक्षण राहिलं होतं. आजी-आजोबांकडेही लक्ष द्यायचं होतं. जयाला यशही मिळायला लागलं. जयाच्या 23व्या वर्षी आईचं निधन झालं. बाहेरच्या निर्दयी जगाशी जया अपरिचित. ज्या चित्रपटांमध्ये त्या काम करायच्या, त्याचे किती पैसे मिळतात, हेही त्यांना माहीत नसायचं. पण त्या सावरल्या.. शिकल्या.. आणि या प्रक्रियेत व्यवहारी आणि चतुर झाल्या. थोच्याच वर्षात त्या तामिळ चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवू लागल्या.

नंतर त्यांच्या आयुष्यात आले तामिळ सुपरस्टार आणि राजकारणी एम जी रामचंद्रन. अम्मांचे गुरूच म्हणा ना.. अम्मा आणि एमजीआर यांनी 28 चित्रपटात एकत्र काम केलं. नंतर एमजीआर यांनी जयांना राजकारणात आणलं. त्यांच्या मनाविरुद्ध की त्यांच्या संमतीनं..माहीत नाही. आधी आमदार झाल्या..मग प्रचार प्रमुख. आणि त्यानंतर 1984मध्ये थेट खासदार. कारण हे त्यांचं इंग्रजीवरही प्रभुत्व होतं.

1987 साली एमजीआर गेले, आणि अम्मांच्या आयुष्यात वादळ आलं. त्यांनी एमजीआर यांची जागा घ्यायचा प्रयत्न केला. पण एमजीआर यांची पत्नी जानकी यांनी विरोध केला. त्या स्वतः मुख्यमंत्री झाल्या. पण वर्षभरातच त्यांचं सरकार राजीव गांधी सरकारनं बरखास्त केलं आणि राष्ट्रपती राजवट लावली. 1989च्या विधानसभा निवडणुकीत अम्मांच्या गटाला 27 जागा मिळाल्या, आणि त्या विरोधी पक्षनेत्या झाल्या.

1991च्या निवडणुकीत त्यांचा दणदणीत विजय झाला, आणि त्या तामिळनाडूच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरल्या. वयाच्या 43व्या वर्षी त्या सीएम झाल्या होत्या. पण 1995मध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप व्हायला लागले. 1996मध्ये त्यांचा पराभव झाला. नंतर कलर टीव्ही घोटाळ्यात त्यांना जेलमध्येही जावं लागलं.

पण फिनिक्स पक्षासारखं राखेतनं उभं राहणं हा अम्मांचा स्थायी भाव. तोपर्यंत जयललितांचं रुपांतर अम्मांमध्ये झालं होतं. 2001मध्ये त्या पुन्हा मुख्यमंत्री झाल्या. लोकप्रिय योजना जाहीर करणं हे नंतर सुरू राहिलं. सहा साली त्यांचा पुन्हा पराभव झाला.. 11 साली पुन्हा निवडून आल्या. पण 2014मध्ये त्यांना भ्रष्टाचाराचं जुनं प्रकरण भोवलं, आणि कायद्यानुसार आमदारकी आणि मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. या काळात त्यांच्या व्याधी बळावल्या होत्या. तीव्र डायबेटीस, हाय बीपी, स्ट्रेस आणि सांधेदुखी. जेलमध्ये गेल्यावर त्यांचे हे आजार बळावले. याच वर्षी मेमध्ये निवडणुका होत्या.. आजारी असूनही त्यांनी प्रचार केला. आणि काय आश्चर्य ! तामिळनाडूच्या राजकारणात कधी न घडणारी गोष्ट घडली. अम्मा सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या. पण यावेळी त्या बहुतांश काम घरूनच करायच्या.. सप्टेंबर महिन्यात त्यांना अपोलो रुग्णालयात दाखलं केलं गेलं. जनतेला साधं काहीतरी कारण सांगितलं. पण तसं नव्हतं.. अनेक दिवसांच्या उपचारांनंतर तामिळनाडूच्याच नाही तर भारतीय राजकारणातलं एक वादळ शमलं.. कायमचं.. पुढची अनेक दशकं तरी अम्मांचं नाव तामिळनाडूच्या समाजजीवनातून पुसलं जाणार नाही, हे निश्चित...

अम्मांचा परिचय..

जन्म : 24 फेब्रुवारी 1948

तामिळनाडूच्या पाच वेळा मुख्यमंत्री

कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्यातल्या मेलुकोट गावात जन्म

गाव : मेलुकोट, तालुका : पांडवपुरा, जिल्हा : मंड्या

एसएससी बोर्डात तामिळनाडूत प्रथम

जयललिता यांना शास्त्रीय नृत्याची आवड

1960 मध्ये म्हैसूरमधल्या रसिक रजनी सभेत त्यांचं नृत्य पाहून शिवाजी गणेशन यांनी त्यांना चित्रपटात संधी दिली.

कन्नड आणि तामिळ चित्रपटसृष्टीत त्या आघाडीच्या नायिका होत्या.

1965 ते 1972 या काळात एम.जी. रामचंद्रन यांच्यासोबत त्यांनी सर्वाधिक चित्रपट केले.

कन्नड आणि तामिळ चित्रपटांसोबतच तेलुगु, हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांतही काम

एम.जी. रामचंद्रन यांच्या आग्रहावरून 1982 मध्ये राजकारणात प्रवेश

1984 ते 1989 राज्यसभेच्या सदस्या

1987 मध्ये एम.जी. रामचंद्रन यांच्या निधनानंतर त्यांच्या उत्तराधिकारी म्हणून घोषणा

24 जून 1991 तामिळनाडूच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून निवड

अवैध संपत्ती जमवल्याच्या प्रकरणावरून त्या वादग्रस्त ठरल्या होत्या

याच प्रकरणात त्यांना काही काळ जेलमध्येही जावं लागलं

मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ

पहिली टर्म

24 जून 1991 ते 12 मे 1996

दुसरी टर्म

14 मे 2001 ते 21 सप्टेंबर 2001

तिसरी टर्म

2 मार्च 2002 ते 12 मे 2006

चौथी टर्म

29 फेब्रुवारी 2011 ते 27 सप्टेंबर 2014

पाचवी टर्म

23 मे 2015 ते 4 डिसेंबर 2016

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 6, 2016, 1:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading