नोटाबंदी म्हणजे सामूहिक लूट -मनमोहन सिंग

 नोटाबंदी म्हणजे सामूहिक लूट -मनमोहन सिंग

  • Share this:

manmohan_singh4 24 नोव्हेंबर : केंद्र सरकारने केलेली नोटाबंदी म्हणजे सामूहिक लूट आहे,असा घणाघाती आरोप माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलाय. या सगळ्या त्रासातून लोकांची सुटका करा, असं आवाहनही त्यांनी केलं. मनमोहन सिंग यांनी राज्यसभेमध्ये सरकारवर जोरदार टीका केली.

सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल आम्हाला कोणताही आक्षेप नाही. मात्र याची अंमलबजावणी करताना सरकारच्या अक्षम्य चुका आणि हलगर्जीपणा झाला, असा आरोपही मनमोहन सिंग यांनी केलाय. या निर्णयामागचा उद्देश चांगला आहे पण सरकारचं पूर्ण व्यवस्थापनच चुकलं, असं मनमोहन सिंग म्हणाले.

या निर्णयामुळे कृषी आणि आर्थिक क्षेत्रावर नेमका काय परिणाम होईल हे आता सांगणं कठीण आहे. पण अचनाक घेतलेल्या या निर्णयामुळे देशाची आथिर्क प्रगती मंदावेल, आपलं सकल राष्ट्रीय उत्पन्न 2 टक्क्यांनी घटेल, असंही त्यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या नागरिकांना भावनिक आवाहन केलं आणि 50 दिवस संयम ठेवायला सांगितलं. 50 दिवस हा तसा कमी कालावधी आहे पण हे 50 दिवस गरिबांच्या स्थितीवर भयंकर परिणाम करणारे ठरू शकतात, असं मनमोहन सिंग म्हणाले.

एटीएम सेंटरमधून नेमकी किती रक्कम काढायची याबद्दलही सरकार सारखे नियम बदलत राहिलं. पंतप्रधान कार्यालय, अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बँक या तिन्ही यंत्रणांचा यामध्ये गोंधळ होता, असा आरोपही मनमोहन सिंग यांनी केला.

गेल्या आठवड्यात सुरू झालेलं संसदेचं हिवाळी अधिवेशन नोटबंदीच्या निर्णयामुळे वादळी ठरतंय. सरकारने जुन्या नोटा रद्द केल्या पण तितक्या प्रमाणात नव्या नोटा न छापल्यामुळे देशात चलन तुटवडा निर्माण झाला. यावर पंतप्रधानांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी विरोधक करतायत. पण यावर अर्थमंत्री अरुण जेटली स्पष्टीकरण देतील, असं सरकारने म्हटलंय.

नोटाबंदीनंतर 88 अब्ज डॉलर्स एवढी रक्कम बँकांमध्ये जमा झालीय आणि 500 आणि 2000 रुपयांच्या जास्तीत जास्त नोटा बँकांमध्ये पाठवण्यात येतायत, असं सरकारचं म्हणणं आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत बँकांमधल्या रांगाही कमी झाल्यायत, असं सरकारने म्हटलंय.

भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला मात्र या निर्णयाला फटका बसलाय. गावागावांमध्ये बँकेच्या शाखा नसल्यामुळे इथे चलनाचा तुटवडा आहे. शेतक•यांना पतपुरवठा करण्यासाठी सरकारने नाबार्डच्या माध्यमातून 21 हजार कोटी रुपयांची तरतूद केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: November 24, 2016, 4:39 PM IST

ताज्या बातम्या