हेरगिरीच्या संशयावरून पाक उच्चायुक्तालयातील अधिकार्‍याला अटक

हेरगिरीच्या संशयावरून पाक उच्चायुक्तालयातील अधिकार्‍याला अटक

  • Share this:

Pakistan High Commission

27 ऑक्टोबर :  पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याला हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या अधिकाऱ्याकडून भारतीय लष्कराशी संबंधित अत्यंत गोपनीय दस्तावेज जप्त करण्यात आला आहे.  दिल्ली क्राईम ब्रँचने ही कारवाई केली असून या कारवाईनंतर भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसीत यांना परराष्ट्र मंत्रालयाने समन्स पाठवला आहे.

मोहम्मद अख्तर असं अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस या अधिकाऱ्यावर नजर ठेऊन होते.  या अधिकाऱ्यासह मौलाना रमझान आणि सुभाष या दोन भारतीय नागरिकांनाही अटक करण्यात आली आहे. हे दोघे भारतीय राजस्थानातील जोधपूरचे रहिवाशी असून ते मोहम्मद अख्तरच्या संपर्कात होते. या प्रकरणातला अजून एक आरोपी शोहेब हा अद्याप फरार आहे.

गुन्हे शाखेच्या गुप्त वार्ता विभागाला या अधिकाऱ्याबाबत माहिती मिळाली होती. पाकिस्तान उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याकडे भारतीय लष्कराशी संबंधित अत्यंत गोपनीय माहिती असल्याचं गुप्त वार्ता विभागाला कळले होते. त्याआधारे शोध घेऊन मोहम्मद अख्तरला अटक करण्यात आली. हा अधिकारी पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयच्याही संपर्कात होता, असं चौकशीत पुढे आलं आहे.

या कारवाईबाबत दिल्ली क्राईम ब्रँचने गृहमंत्री राजनाथ सिंह आणि दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनाही माहिती दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयालाही तातडीने अहवाल पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, पाक उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याची हेरगिरी गांभीर्याने दखल घेत पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसीत यांना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने चर्चेसाठी बोलावलं होतं. मात्र या प्रकरणाशी पाक उच्चायुक्तालयाचा काहीही संबंध नसून पाकिस्तानी अधिकार्‍याला नाहक गोवण्याचा प्रयत्न झाल्याचा उलट कांगावा बसीत यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: October 27, 2016, 2:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading