अखेर भारत-पाकिस्तान चर्चा रद्द

अखेर भारत-पाकिस्तान चर्चा रद्द

  • Share this:

indo pak 34422 ऑगस्ट : काश्मीर प्रश्न आणि फुटिरतावादी हुर्रियत नेत्यांच्या भेटीवर अडून बसलेल्या पाकिस्तानेनं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरची बैठक रद्द केलीये. भारताने लादलेल्या अटी आम्हाला अमान्य आहे असं कारण पुढे करत चर्चा करण्यास नकार दिलाय. तर भारतानेही पाकिस्तानाला दहशतवादावरच चर्चा होईल पण हुर्रियत भेट आणि काश्मीरचा प्रश्न कदापी मान्य नाही अशा कडक शब्दांत पाकला सुनावले होते. अखेरीस ही बैठक आता रद्द झालीये.

उद्या 23 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरची बैठक होणार होती. पण या बैठकीवरून भारत पाकिस्तानमध्ये जोरदार तणाव निर्माण झाला आणि अखेरीस तो मोडीत निघाला. या बैठकीआधी हुर्रियत नेत्यांना भेटण्याचा हेका पाकिस्ताननं कायम ठेवला. तर भारतानं कडक भूमिका घेत अशी चर्चा करणार असाल तर येवूच नका असं ठणकावून सांगितलं. त्या आधी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांनी भारताला चर्चा टाळायची आहे असा आरोप केला होता. चर्चेत काश्मीरचा मुद्दाही असेल असंही ते म्हणाले.

तर दुसरीकडे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज संध्याकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानला चांगलंच फैलावर घेतलं. दहशतवादाची समस्या सुटल्याशिवाय काश्मीरवर चर्चा नाही अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. सल्लागार स्तराची बोलणी नवाज शरीफ यांना नकोच होती. ती रद्द व्हावी यासाठी ते प्रयत्न करत होते, असा गंभीर आरोप स्वराज यांनी केला. बलुचिस्तानबद्दलचं डॉसियर आम्हाला खुशाल द्या. डॉसिअर असे हवेत मिरवायचे नसतात, समोर बसून सुपूर्द करायचे असतात, असंही सुषमांनी सरताज अजीज यांना जाहीररित्या सुनावलं.

भारत पाक बोलणींमध्ये कोणताही तिसरा पक्ष चालणार नाही, तुम्ही हुरियतशी बोलणी करण्याचा हट्ट सोडा, असंही सुषमांनी ठणकावलं होतं. अखेरीस भारताची कठोर भूमिका पाकिस्तानाला चांगलीच झोंबली आणि आता ही बैठक रद्द झालीये. या आधीही पाकिस्ताननं हुर्रियत नेत्यांना भेटण्याचा आग्रह धरल्यानं सचिव स्तरावरची बोलणी भारतानं थांबवली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 22, 2015, 9:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading