S M L

'स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया', पंतप्रधानांचा नवा नारा

Samruddha Bhambure | Updated On: Aug 15, 2015 04:11 PM IST

'स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया', पंतप्रधानांचा नवा नारा

15 ऑगस्ट : देशाच्या प्रत्येक कानाकोपर्‍यातील आदिवासी, दलित नागरिक उभारी घेऊ शकला तर यातूनच नवा भारत उभा राहील, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन 'स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया'चा नारा दिला.

देशभरात आज मोठ्या उत्साहात 69 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. पंतप्रधानांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी देशवासीयांशी संवाद साधला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, अर्थमंत्री अरुण जेठली यांच्यासह अनेक मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी जनतेची भागीदारी आणि एकता देशाची मोठी ताकद आहे, या भागीदारीतूनच देश चालवावा लागणार आहे, देशात जातीवादाचे विष आणि भेदभावाला विकासाच्या अमृतधारेने संपवावं लागणार आहे, असं सांगितलं. त्याचबरोबर बहुचर्चित 'वन रँक वन पेंशन' योजनेबाबत मोदींनी यावेळी कोणतीही घोषणा केली नाही. मात्र, राष्ट्रध्वजाच्या साक्षीने मोदींनी देशातील निवृत्त सैनिकांना 'वन रँक वन पेंशन' योजनेसाठी सरकार कटीबद्ध असल्याचे वचन दिले. वन रँक वन पेंशन योजना आम्ही स्विकारली असून ती लागू करण्यावर चर्चा सुरू आहे, असे आश्वासन मोदींनी यावेळी दिले.

गेल्या 15 महिन्यांत देशात भ्रष्टाचार झाला नाही, असं म्हणत मोदींनी काँग्रेसला टोला लगावला. आणि भ्रष्टाचारमुक्त भारताची हमी दिली. काळ्या पैशांबाबत सरकारनं कठोर पावलं उचलल्यानं काही जणांची अडचण झाल्याचं मोदी म्हणाले. छोट्या नोकर्‍यांसाठी मुलाखती बंद करण्याचं आवाहन त्यांनी केलं.

वर्ष 2022 पर्यंत आपल्याला सक्षम, समृद्ध, स्वस्थ, स्वाभिमानी भारत बनवायाचा आहे. प्रत्येकाला घर मिळावं, रोजगार मिळावा, देशातील तळागाळापर्यंत 24 तास वीज पोहोचावी, याचं स्वप्न केंद्र शासनाने पाहिले आहे. ते पूर्ण होण्याच्या दृष्टीने कृतिशील उपाय योजना केल्या जात आहेत. पण, त्यासाठी देशातील सव्वाशे कोटी नागरिकांनीही असेच स्वप्न पाहावे आणि संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. आजची सकाळ ही 125 कोटी देशवासीयांच्या स्वप्नांची, संकल्पनांची सकाळ आहे. स्वातंत्र सैनिकांनी आपल्यासाठी बलिदान दिले. पण, स्वप्ने, संकल्प सोडले नाहीत, त्यांना मी कोटी कोटी प्रणाम करतो, असं मोदी म्हणाले.

देशातील श्रमिकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. देशातील श्रमिकांचा गौरव हे आपले कर्तव्य आहे. शेतकर्‍यांना हवी ती सुविधा पुरविण्यावर सरकारचा भर असल्याचे सांगत मोदींनी कृषी खात्याचे नामकरण करण्यात आल्याचे जाहीर केले. कृषी खाते यापुढे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय यावाने ओळखले जाईल, असं मोदी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 15, 2015 10:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close