अलविदा कलाम सर...

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 31, 2015 10:42 AM IST

अलविदा कलाम सर...

rameshwarmkala30 जुलै :: माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना आज (गुरुवारी) अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या मूळ गावी रामेश्वरममध्ये कलाम कायमचे विसावले. कलाम यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लष्कराने मिसाईल मॅनला अखेरची मानवंदना दिली.

तामिळनाडूतील रामेश्वरममध्ये बुधवारी त्यांचं पार्थिव नवी दिल्लीहून आणण्यात आलं. आज सकाळी त्यांच्या घरापासून शोकाकूल वातावरणात अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी आपल्या या लाडक्या राष्ट्रपतींना निरोप देण्यासाठी रामेश्वरम येथील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

कलाम यांच्या अंत्यसंस्कार विधीसाठी अनेक राजकीय नेत्यांसह रामेश्वरममध्ये जनसागर लोटला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक मान्यवर अलविदा करण्यासाठी उपस्थित होते.

कालपासून कलाम यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या रामेश्वरम इथल्या घरात ठेवण्यात आलं होतं. लेखक, शास्त्र, भारतरत्न आणि लोकांचे लाडके राष्ट्रपती अशा या 'मिसाईल मॅन' अब्दुल कलाम यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला.

===========================================================================

Loading...

» ‘मिसाईल मॅन’ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जीवनपट

विख्यात अणुशास्त्रज्ञ, स्वदेशी बनावटीच्या भारतीय क्षेपणास्त्रांचे शिल्पकार, अंतराळाचा वेध घेणारे शास्त्रज्ञ, कवी, तत्वज्ञ आणि एक सह्रदयी माणूस…म्हणजेच भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम…युवकांचे प्रेरणास्थान…मोठी स्वप्ने पाहा आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम करा…हा मंत्र त्यांनी देशभरातल्या युवकांना अखेरच्या श्वासापर्यंत दिला.

तामिळनाडूतल्या पवित्र रामेश्वरम् इथं 15 ऑक्टोबर 1931 रोजी एका सामान्य कुटूंबात त्यांचा जन्म झाला. वडिलांचा त्यांच्यावर सर्वात जास्त प्रभाव…रामेश्वरम् च्या मंदिराचे मुख्य पुजारी आणि तिथल्या चर्चचे फादर हे कलामांच्या वडिलांचे जीवलग मित्र…त्यामुळं अगदी लहानपणापासून त्यांच्यावर सर्वधर्मसमभावाचे संस्कार झाले आणि आयुष्यभर त्यांनी ते पाळले. सर्व धर्मांपेक्षा मोठा धर्म हा `मानव धर्म` आहे हे त्यांनी आपल्या आचरणानं सिद्ध करून दाखवलं.

रामनाथपुरम् इथं त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्याचं बालपण अतिशय कष्टात गेलं. वर्तमानपत्रे विकून, तसंच लहान मोठी कामे करुन त्यांनी आपल्या कुटूंबाला मदत केली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तिथं बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये प्रवेश घेतला. इथं एअरोनॉटीकल इंजिनियरिंगमध्ये पदवी घेतल्यानंतर त्यांच्याआयुष्याला वेगळं वळण मिळालं.

कलामांची कारकीर्द सुरू झाली ती इस्त्रोमधून…प्रोजेक्ट डायरेक्टर असताना त्यांनी पीएसएलव्ही या उपग्रह प्रक्षेपक वाहकाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली आणि त्याच कामगिरीच्या बळावर भारतानं मोजक्या देशांच्या यादीत स्थान मिळवलं. दोन दशकांच्या इस्त्रोमधल्या नेत्रदीपक कामगिरीनंतर डॉ. कलामांच्या खांद्यावर स्वदेशी क्षेपणास्त्रांच्या विकासाची जबाबदारी देण्यात आली आणि भारताच्या संरक्षण क्षेत्रानं कात टाकली…अग्नी आणि पृथ्वी या क्षेपणास्त्रानं भारताचं सामर्थ कित्येक पटीनं वाढलं.

सर्व जगाचा दबाव झुगारून भारतानं 1974 आणि 1998 मध्ये अणुचाचणी घेतली…राजस्थानच्या वाळवंटात बुद्ध हसला. या दोन्ही मोहिमांमध्ये डॉ. कलामांची महत्वाची भूमिका होती. 1998मध्ये तर ते अणुस्फोट घडवून आणणार्‍या पथकाचे नेतेच होते. भारताचा अणुकार्यक्रम हा शांततेसाठीच आहे हे त्यांनी जगभरातल्या शास्त्रज्ञांना ठासून सांगितलं. संशोधन करताना सामान्य माणूस हा त्यांच्या संशोधनाचा केंद्र बिंदू होता. सामान्य माणसांशी जुळलेली त्यांची नाळ कधीच तुटली नाही.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदं भुषवली आणि त्यांच्या कामानं त्या पदांची उंची वाढली. पाचशे तज्ञांच्या मदतीनं त्यांनी आधुनिक भारताचं एक व्हिजन मांडलं. `व्हिजन-2020` हे व्हिजन प्रत्यक्षात यावं यासाठी झपाटून कामाला लागले, राजकारण, समाजकारण, अर्थकारण या सर्वच क्षेत्रातल्या लोकांसमोर त्यांनी हे व्हिजन मांडलं आणि त्यांना काम करण्यासाठी प्रेरीतही केलं.

त्यांच्या या कार्याला जगभरातले अनेक पुरस्कार मिळाले. 1997 मध्ये त्यांना सर्वोच्च `भारतरत्न` पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

2002 मध्ये त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं…शास्त्रज्ञ डॉ. कलाम भारताचे राष्ट्रपती झाले…कलाम राष्ट्रपती झाल्यानंतर राष्ट्रपती भवन लोकांसाठी खुलं झालं. लोकांना भेटणं, युवकांशी बोलणं, लहान मुलांशी संवाद साधणं यामध्ये ते मानापासून रमून जात. त्यामुळचं त्यांना लोकांचे राष्ट्रपती असं म्हटलं गेलं.

डॉ. कलाम हे फक्त शास्त्रज्ञच नव्हते..ते लेखक आणि कवीही होते…साहित्य, संगित, पर्यावरण हे त्याचे आवडीचे विषय. ‘विंग्ज् ऑफ फायर’, ‘व्हिजन 2020′, ‘इग्नायटेड माईंड’ ही त्यांची पुस्तकं प्रचंड गाजली. विज्ञाननिष्ठ असणारे डॉ. कलाम अध्यात्म्याच्या प्रांतातही तेवढेच रमायचे… त्यांना संगीताचीही आवड होती. त्यांची रुद्रवीणा वाजवातानाची छबी देशभरात पोहोचली होती. विज्ञान आणि अध्यात्मानं हातात हात घालून चालावं या आईस्टाईन यांच्या विचारांवर त्यांची प्रगाढ श्रद्धा होती.

याच संस्कारामुळं वयाच्या 84 व्या वर्षीही ते अखंडपणे कार्यरत होते…देश, समाज, युवक यांचा विकास हेच त्यांच्या आयुष्याचं मिशन होतं…याच मिशनवर असताना त्यांनी शेवटचा श्वास घेतला. मृत्यू हा अटळ आहे…तो कुणालाच चूकत नाही…पण काम करताना मृत्यू यावा असं डॉ. कलाम नेहमी म्हणायचे…अशा थोर कर्मयोगी शास्त्रज्ञाच्या कृतार्थ आयुष्याला आयबीएन-लोकमतचा सलाम…

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2015 01:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...