Elec-widget

तणाव मुक्ती आणि आनंदी आयुष्यासाठी योग महत्त्वाचा- पंतप्रधान

तणाव मुक्ती आणि आनंदी आयुष्यासाठी योग महत्त्वाचा- पंतप्रधान

  • Share this:

YOGA DAY!!

21 जून : भारतीय संस्कृतीची जागतिक ओळख असलेला योग आज, रविवारी भारतीय सीमा ओलांडून जगभरात पोहोचला आहे. भारतासह संपूर्ण जगभरात आज (रविवारी) पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. दिल्लीतील राजपथावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हजारोंच्या संख्येनं लोकांनी आज योगसाधना केली. यावेळी बोलताना तणाव मुक्ती आणि आनंदी आयुष्यासाठी योग महत्त्वाचा असून यामुळे जगभरात शांतता आणि नवीन ऊर्जा निर्माण करण्याची एक संधी मिळाली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, योगद्वारे शरीर, आत्मा, मन या सर्वांवर संतुलन मिळवता येतं असंही त्यांनी म्हटलं आहे.

भारतासह जगभरात आज 21 जून रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्त दिल्लीतील राजपथवर योग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह सुमारे 39 हजार लोकांनी 35 मिनिटांत 21 योगासनं केली. त्याची नोंद गिनीज बुकमध्येही घेण्यात आली आहे. पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांमध्ये तसंच जगभरातील 177 देशांमध्ये हा योगसोहळा पार पडला आहे. मुंबईतही योगनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी योगाचे महत्त्व सांगत योग करून निरोगी राहण्याचा सल्ला दिला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनाला पाठिंबा देणार्‍या संयुक्त राष्ट्र संघाचे आभार मानले. दिल्लीतील राजपथ हा योगपथ होईल असा कोणीही विचारही केला नव्हता असंही त्यांनी नमूद केलं.

राजपथावर इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच कार्यक्रम होत असल्यामुळे चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. त्यातच पंतप्रधान मोदींसह मंत्रिमंडळातील अन्य मंत्री देखील या कार्यक्रमास उपस्थित होते. सुरक्षेच्या कारणामुळे केवळ निमंत्रितांनाच या कार्यक्रमात प्रवेश देण्यात आलेला आहे.

Loading...

देशभरात भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी, मंत्र्यांनी आपापल्या राज्यांमध्ये आणि मतदारसंघांमध्ये योग दिनाचे कार्यक्रम घेतले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौमध्ये योग दिन साजरा केला. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी शिमल्यात योग दिन सोहळ्यात भाग घेतला. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनीही योग करत योग दिन साजरा केला. भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भोपाळमध्ये, वसुंधरा राजे सिंधिया यांनी जयपूरमध्ये तर जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंग यांनी श्रीनगरमध्ये योग करत योग दिन साजरा केला.

177 देशांमध्येही आज योगसोहळा

आज, रविवारी आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने 177 देशांमधील 251 शहरांमध्ये त्या त्या ठिकाणच्या भारतीय दूतावासांतर्फे योगसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांमधील भारतीय मिशनतर्फे होणार्‍या कार्यक्रमात संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर हे उपस्थित राहणार आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2015 09:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...