S M L

मिशन म्यानमार फत्ते, 30 मिनिटांत 20 अतिरेक्यांचा खात्मा

Sachin Salve | Updated On: Jun 10, 2015 05:01 PM IST

मिशन म्यानमार फत्ते, 30 मिनिटांत 20 अतिरेक्यांचा खात्मा

10 जून : मणिपूरमध्ये गेल्या आठवड्यात भारतीय अतिरेक्यांच्या हल्ल्यात 18 भारतीय जवान शहीद झाले होते. भारतानं ह्या हल्ल्याचा बदला घेतलाय आणि तोही मोठ्या आक्रमकपणे आणि आतापर्यंतच्या चाकोरीच्या बाहेर जाऊन.. एनएससीएनच्या अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी भारतानं म्यानमारच्या हद्दीत जाऊन कारवाई केली. भारतानं देशाची सीमा ओलांडून कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मंगळवारी मध्यरात्री 1 वाजता जवानांनी कारवाई सुरू केली..आणि पहाटे चार वाजता 20 अतिरेक्यांचा खात्मा करून ही मोहीम फत्ते झाली. मुख्य कारवाई केवळ 30 मिनिटांत पूर्ण झाली.

मणिपूरमध्ये गेल्या आठवड्यात एनएससीएननं सैनिकांवर केलेला हल्ला हा गेल्या तीन दशकांतला लष्करावरचा मोठा हल्ला होता. त्यात 18 जवान शहीद झाले. या हल्ल्यामुळे भारताच्या सुरक्षा यंत्रणेलाही हादरवून सोडलं. पण या हल्ल्यानंतर भारतानं उचललेलं पाऊल हे अनपेक्षित आणि आश्चर्याचा धक्का देणारं होतं. भारतानं आतापर्यंतची पारंपरिक चौकट मोडून देशाची सीमा ओलांडली आणि म्यानमारमध्ये लपलेल्या एनएससीएनच्या अतिरेक्यांचा खात्मा केला.

म्यानमारच्या घनदाट जंगलांमध्ये सीमाभागात एनएससीएन-के आणि केवायकेएल या अतिरेकी संघटनांचे दोन तळ असल्याची माहिती गुप्तचर संस्थांना मिळाली. सोमवारी या धाडसी मोहिमेसाठी भारताला म्यानमारकडून हिरवा कंदील मिळाला. आणि लगेच लष्करानं मोहिमेला सुुरवात केली. लष्कराच्या 21 पॅराच्या कमांडोजनी ही मोहीम हाती घेतली आणि त्यासाठी त्यांना साथ मिळाली एअरफोर्सच्या एएलएच म्हणजेच ऍडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर्सचा...एअरफोर्सच्या चॉपर्सनी म्यानमारच्या हद्दीत प्रवेश केला नाही. कमांडोंना सीमेलगत भारतीय हद्दीत उतरवण्यात आलं. मंगळवारी मध्यरात्री 1 वाजता जवानांनी कारवाई सुरू केली आणि पहाटे चार वाजता 20 अतिरेक्यांचा खात्मा करून ही मोहीम फत्ते झाली. या मोहिमेला लष्करानं कोणतंही नाव दिलं नव्हतं.


myanmarअतिरेकी हल्ल्यानंतर केवळ पाच दिवसांच्या आत भारतीय सैन्यांनी बदला घेतला. तेही दुसर्‍या देशात जाऊन...यासाठी राजकीय पातळीवरही पक्का गृहपाठ झाला होता. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा बांगलादेशचा दौरा आयत्यावेळी रद्द केला आणि त्यांनी या मोहिमेचं नियोजन करण्यासाठी मणिपूर गाठलं. त्यापूर्वी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी म्यानमारला भेट दिली आणि या मोहिमेसाठी म्यानमार सरकारची मदत मिळवली.

सैनिकांनी जिंकावं आणि राज्यकर्त्यांनी गमवावं अशी टीका आतापर्यंत होत होती. पण मोदी सरकारनं उचलेल्या या पावलामुळे जवानांना नवी ऊर्जा मिळालीय. तर मातृभूमीसाठी दिलेलं बलिदान सरकार वाया जाऊ देणार नाही, असा विश्वास शहिदांच्या कुटुंबीयांनाही आता वाटू शकतो.

सीमेपलीकडच्या दहशतवादाला भारताचं उत्तर आतापर्यंत इशारा आणि निषेधापुरतंच मर्यादित होतं. पण म्यानमारमधली भारतीय लष्कराची ही कारवाई सीमेवर वारंवार उचापती करणार्‍या पाकिस्तानलाही इशारा आहे आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी मोदी सरकारची रणनीती काय असेल, याची ही एक झलकही आहे.

Loading...
Loading...

नेमकं परराष्ट्र मंत्रालयानं काय केलं ते...

- या मोहिमेची गरज म्यानमार सरकारला पटवून दिली

- परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी काही दिवसांपूर्वी म्यानमारला गुप्तपणे भेट दिली

- सोमवारी सकाळी म्यानमार सरकारनं मोहिमेला परवानगी दिली

- भारताचे डिफेन्स अटॅशे गौरव शर्मा यांनी मोहिमेचा तपशील म्यानमार लष्कराला कळवला

- अटॅशे म्हणजे एक उच्च पदावरचा लष्करी अधिकारी दूतावासात विशेष नेमणुकीवर पाठवला जातो

- दहशतवादविरोधी कारवायांसाठी म्यानमारचं सहकार्य मिळावं यासाठी भारतीय राजनैतिक अधिकारी म्यानमारमध्ये अनेक वर्ष काम करतायत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 10, 2015 05:01 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close