60 वर्षांत देशाला लुबाडणार्‍यांचे 'बुरे दिन' आलेत - नरेंद्र मोदी

60 वर्षांत देशाला लुबाडणार्‍यांचे 'बुरे दिन' आलेत - नरेंद्र मोदी

  • Share this:

Modi-Mathura-one-year-PTI

25 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला 26 मे म्हणजे मंगळवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपने जंगी कार्यक्रम आखला आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवारी) मथुरेत भव्य सभा घेतली. या सभेत त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला आणि वर्षभरातल्या आपल्या कामांचा पाढाच वाचला. या वर्षात एकही घोटाळा झाला नाही, असं म्हणत गेल्या साठ वर्षांत देशाला लुबाडणार्‍यांसाठी 'बुरे दिन' आल्याचा टोला मोदींनी काँग्रेसला लगावला.

मोदी म्हणाले, अजून एक वर्ष यूपीए सरकारकडे सत्ता असती, तर देश अजून किती डुबला असता, याचा विचार केला पाहिजे. त्यांच्या काळात रोज एक घोटाळा उघड होत होता. भ्रष्टाचाराची प्रकरणे रोज उघडकीस येत होती. रोज नेत्यांना तुरुंगात जावे लागत होते. किती वाईट दिवस होते. पण देशातील लोकांनी मोठा निर्णय घेऊन 30 वर्षांनंतर देशात पूर्ण बहुमताचे सरकार निवडून दिले. देशातील लोकांनीच हे परिवर्तन घडवून आणले आहे.

गेल्या सरकारने कोळसा खाणीमध्ये चोरी केली होती. आमच्या सरकारने आत्तापर्यंत केवळ 29 कोळसा खाणींचा लिलाव केला. त्यामधून सरकारला तीन लाख कोटी रुपये सरकारला मिळणार आहेत. अशा 200 कोळसा खाणींचा लिलाव होणार आहे. हा पैसा जनतेच्या कल्याणासाठी वापरण्यात येणार आहे. आधीच्या सरकारने देशाच्या संपत्तीची लूट केली. पण, आपण कोणत्याही स्थितीत देशाची संपत्ती लुटू देणार नाही, असे सांगत त्यांनी गेल्या वर्षभरात भ्रष्टाचार घडल्याचे, रिमोट कंट्रोलने सरकार चालत असल्याचे एकही उदाहरण समोर आले नसल्याचे सांगितले.

आपले सरकार गरिबांना समर्पित असल्यामुळे जनकल्याण पर्वाची सुरुवात छोट्या गावांपासून करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून मोदींनी जनधन योजना, विमा सुरक्षा योजनांसह गेल्या वर्षभरात सरकराने घेतलेल्या अनेक महत्वाच्या निर्णयांची जंत्रीच वाचली. आपण दिलेली आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने सरकार काम करत आहे आणि सरकारमधला भ्रष्टाचार आपण संपवल्याचा दावा पंतप्रधानांनी केला.

भाजपनं मंगळवारपासून आठवडाभर देशभरात पत्रकार परिषदांचं आयोजन केलं आहे. गेल्यावर्षी 16 मे रोजी भाजपनं लोकसभेच्या 282 जागा जिंकत इतिहास रचला होता आणि त्यानंतर 10 दिवसांत म्हणजेच 26 मे रोजी नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदासाठीचा शपथविधी झाला.

Follow @ibnlokmattv

First published: May 25, 2015, 8:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading