पंतप्रधानांनीच मला भूकंपाची माहिती दिली - राजनाथ सिंह

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 27, 2015 04:09 PM IST

पंतप्रधानांनीच मला भूकंपाची माहिती दिली - राजनाथ सिंह

rajnath-singh-lok-sabha-650_650x400_71430121023

27 एप्रिल : नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के बसल्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याबद्दल माहिती मिळाली होती. त्यांनीच मला फोन करून त्याबद्दल माहिती दिली आणि शनिवारी दुपारी तातडीने बैठक बोलावल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी लोकसभेत सांगितलं. गृहमंत्री असताना भूकंपाची माहिती माझ्याकडे असणं अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही अशी कबुलीच राजनाथ सिंह यांनी लोकसभेत देऊन टाकली.

संसदेच्या दोन्ही सभागृहात आज नेपाळमधील भूकंपात मृत्यूमुखी पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकसभेत कामकाजाला सुरुवात होताच लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी भूकंपामुळे नेपाळ आणि भारतात झालेल्या हानीची माहिती दिली. अफवांना बळी पडू नये, विनाकारण काळजी करु नये, त्याचप्रमाणे नागरिकांनी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असं आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आलं. त्यानंतर, नेपाळसह उत्तर भारतात बसलेले भूकंपाचे धक्के आणि केंद्र सरकारकडून करण्यात येणारी मदत याबद्दल

राजनाथसिंह यांनी लोकसभेत निवेदन सादर केलं.

राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, मी आणि पंतप्रधान दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात होतो. हा कार्यक्रम संपल्यावर परतत असताना मला मोदींचा फोन आला आणि त्यांनी नेपाळसह उत्तर भारतात बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांबद्दल माहिती दिली. गृहमंत्री असूनही माझ्याआधी त्यांच्याकडे याबद्दल माहिती होती. मी टीव्ही सुरू केल्यावर मला घटनेची तीव्रता लक्षात आली. मोदींनी लगेचच दुपारी तीन वाजता बैठक बोलावली होती. त्याच दिवशी त्यांनी 11 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांच्या राज्यातील परिस्थितीची माहिती करून घेतली. मीसुद्धा तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांच्याकडून परिस्थितीबद्दल माहिती घेतली, असं राजनाथसिंह यांनी सांगितलं.

Loading...

एनडीआरएफची 1 तुकडी, डॉक्टरांचं पथक नेपाळमध्ये दाखल झालं असून आवश्यक ती सर्व मदत नेपाळमध्ये पोहोचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. एनडीआरएफच्या 4 तुकड्या बिहारमध्ये तर 1 तुकडी उत्तरप्रदेशात दाखल झाली आहे. आम्ही सतत राज्य सरकारांच्या संपर्कात असल्याचंही ते म्हटले. भारत- नेपाळ सीमेवर रस्तामार्गे येणार्‍या नागरिकांसाठी आवश्यक त्या सर्व सेवा पुरवण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये काठमांडूहून बससेवेनंही अनेक पर्यटकांना आणण्यात येत आहेत. भारत नेपाळला आवश्यक ती सर्व मदत करणार असल्याचं सांगत, भारतात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसदारांना केंद्र सरकार आर्थिक मदत करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पीडित कुटुंबांना सरकारकडून 4 लाख रुपये आणि पंतप्रधान निधीतून 2 लाख रुपये मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी यापूर्वी केली आहे. दरम्यान, मुलायमसिंह यादव यांनी पीडित कुटुंबांना 10 लाख रुपये देण्याची मागणी केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2015 04:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...