शेतकर्‍यांसाठी सरकारी मदतीची मर्यादा 50 वरून 33 टक्के - मोदी

शेतकर्‍यांसाठी सरकारी मदतीची मर्यादा 50 वरून 33 टक्के - मोदी

  • Share this:

Sir narendra modi

08 एप्रिल : अवकाळी आणि गारपीटग्रस्त शेतकऱयांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलासादायक घोषणा केली आहे. नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांसाठी सरकारी मदतीची मर्यादा 50 वरून 33 टक्क्यांवर कमी करण्यात आली आहे. तसंच, शेतकर्‍यांना सध्या मिळणार्‍या नुकसान भरपाईपेक्षा दिडपट रक्कम जादा मिळणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली.

20 हजार कोटींचे भांडवल असलेल्या मुद्रा बँकेच्या उदघाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आलं आहे. या बँकेतून लघु उद्योजकांना 10 लाख रुपयांपर्यंतच कर्ज दिलं जाऊ शकेल तसंच ही बँक छोटं कर्ज देणार्‍या बँक संस्थांवर देखरेखीचंही काम करेल. या बँकेच्या माध्यमातून देशातील शेतकर्‍याला मोठ्या प्रमाणावर मदत होणार असल्याचं मोदींनी सांगितले. तसंच शेतकर्‍यांना बँकेकडून मिळाणार्‍या मदतीत आता वाढ करण्यात आली असून दुष्काळग्रस्त शेतकर्‍याला मिळणार्‍या भरपाईत दीडपटीने वाढ करण्यात आली असल्याचं मोदी म्हणाले.

लघु वित्तपुरवठा संस्थांसाठी धोरण ठरवणे, त्यांची नोंदणी प्रमाणीकरण करणे तसंच मानांकन करणे ही या बँकेची प्रमुख कामं असतील. देशात सुमारे 5.77 कोटी लघु उद्योजक आहेत. त्यांच्या नियमनाची जबाबदारी मुद्रा बँकेवर असेल. बजेटच्या भाषणामध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मुद्रा बँकेची घोषणा केली होती. मुद्रा या शब्दाचा 'मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी' असा अर्थ असून सूक्ष्म आणि लघु उद्योगधंद्यांना आर्थिक विकासाला गती देणे हा मुद्रा बँकेचा उद्देश आहे.

छोटे उत्पादक, दुकानदार, फळं आणि भाजीविक्रेते, सलून, ब्युटी पार्लर, ट्रक ऑपरेटर्स, फेरीवाले, शहरी आणि ग्रामीण भागातले कारागीर यांना मुद्रा बँकेच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळणार आहे. तरुण आणि महिलांना उद्योगधंद्यासाठी चालना देण्यावर अधिक भर देण्यात येणार आहे.

दरम्यान, विरोधक काही या निर्णायावर खुश नाहीत. सध्या गारपिटीची प्रलंबित मदत द्या, ही घोषणांची तात्पुरती मलमपट्टी नको, असं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. तर भूसंपादन कायद्यात सुधारणांचा प्रस्ताव ठेवल्यामुळे नाराज झालेल्या शेतकर्‍यांना खूश करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, अशीही टीका विरोधक करतायत.

Follow @ibnlokmattv

First published: April 8, 2015, 3:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading