भूसंपादन विधेयकातून शेतकर्‍यांच्या गळ्याभोवती फास आवळला जातोय - शिवसेना

  • Share this:

Uddhav modi

12 मार्च : भूसंपादन विधेयकातून शेतकर्‍यांच्या गळ्याभोवती फास आवळला जातोय, असं म्हणत शिवसेनेने 'सामना'तून भाजप सरकारवर कडाडून हल्ला केला आहे. तसंच शेतकर्‍यांचे गळे कापून मूठभर उद्योगपतींचा विकास होत असल्याचा आरोप या अग्रलेखात करण्यात आला आहे.

लोकसभेत भूसंपादन विधेयक मंजूर होत असताना शिवसेनेने विरोधात मतदान न करता तटस्थ राहणं पसंत केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज (गुरुवारी) भूसंपादन विधेयकाबाबत आपली भूमिका 'सामना'च्या अग्रलेखातून मांडली आहे.

काय म्हटलं आहे अग्रलेखात?

शेतकर्‍यांकडे मते मागायची, भरमसाट आश्‍वासने द्यायची आणि सत्ता येताच त्यांच्या जमिनीचा तुकडा त्यांच्या परवानगीशिवाय हिसकावून घ्यायचा. हे पाप शिवसेना कदापि करणार नाही. शिवसेनेच्या खासदारांनी मतदानात भाग घेतला नाही. या विधेयकानं शेतकर्‍यांच्या गळ्याभोवती फास आवळला जात असताना या कामात शिवसेना सहभागी नव्हती, याची नोंद इतिहासात राहील. हे विधेयक शेतकर्‍यांची तिरडी बांधणारं आहे. शिवसेना ढोंग करत नाही. आम्ही जे केले ते केले एका प्रामाणिक भावनेने केले. शेतकर्‍यांचे शाप घेऊन आम्हाला एक दिवसही सुखाने झोप घेता येणार नाही.

Loading...

शिवसेना उद्योग आणि विकासाचा शत्रू नाही. पण शेतकर्‍यांचे गळे कापून व त्यांच्या रक्तातून मूठभर उद्योगपतींचे विकासमळे फुलणार असतील तर ते आम्ही कसे मान्य करणार? मुंबईतला उद्योग इतरत्र पळवण्याचे कारस्थान आता रचलं जातं आहे. मुंबईतील महत्त्वाची कार्यालये, डायमंड मार्केट व इतर आस्थापनांची कार्यालये जोरजबरदस्तीने पळवून कुणाला आबाद होता येणार नाही. पाच हजारांचे कर्ज फेडता येत नाही म्हणून शेतकरी लाजेखातर आत्महत्या करतो, पण त्याला हर्षदभाई बनून शेअर बाजारातला 'बिग बुल' बनता येत नाही हे वास्तव आहे. सत्तेसाठी माती खाण्याचं काम शिवसेनेनं केले नाही. कायदा तुमचा असला तरी आमचा वायदा शेतकर्‍यांशी आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2015 09:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...