11 मार्च : कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविरोधात आज (बुधवारी) विशेष कोर्टाने समन्स जारी केला आहे. कोर्टाने मनमोहन सिंह यांना 8 एप्रिल रोजी विशेष कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता याप्रकरणात मनमोहन सिंग यांना आरोपी म्हणून कोर्टात उपस्थित रहावं लागणार आहे.
सिंग यांच्याबरोबर उद्योजक कुमार मंगलम, कोळसा मंत्रालयाचे तत्कालीन सचिव पीसी पारेख आणि हिंदाल्को समुहाच्या तीन अधिकार्यांविरोधातही आरोपी म्हणून समन्स बजावण्यात आला आहे.
कॅगच्या अहवालात सरकारला कोळसा खाणींच्या वाटपात 1लाख 86 हजार कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. या प्रकरणी सीबीआयने गेल्यावर्षी क्लोझर रिपोर्ट सादर केला होता. पण कोळसा मंत्रालयाची जबाबदारी त्यावेळी माजी पंतप्रधानांकडे होती. त्यामुळे सीबीआयनं याप्रकरणी मनमोहन सिंहांची चौकशीही केली होती. त्यानंतर कोर्टाने आता मनमोहन सिंह यांना समन्स पाठवला आहे.
या प्रकरणी झालेला घोटाळा समोर आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने खाणींचे लिलाव रद्द केलं होतं. पण मोदी सरकारने पुन्हा या खाणींचा लिलाव सुरू केला असून या लिलावातून सरकारी तिजोरीत कोट्यावधी रुपये जमा झाले आहेत.
Follow @ibnlokmattv |