बी.के. लोशलींच्या वक्तव्याची चौकशी करू- मनोहर पर्रिकर

बी.के. लोशलींच्या वक्तव्याची चौकशी करू- मनोहर पर्रिकर

  • Share this:

Parikar

18 फेब्रुवारी :  नववर्षाच्या पूर्वसंध्येला गुजरातमधल्या पोरबंदर इथे पाकिस्तानमधून आलेल्या बोटीचा गुंता आणखी वाढला आहे. तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक बी. के. लोशली यांच्या खळबळजनक वक्तव्यानंतर केंद्र सरकार त्यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. भारताच्या सागरी हद्दीत घुसखोरी करणार्‍या पाकिस्तानी बोटीला पोरबंदर समुद्रात उडवून देण्याचा आदेश बी.के. लोशली यांनी दिल्याचे वृत्त 'इंडियन एक्सप्रेस'ने प्रसिद्ध केले आहे. लोशली यांनी केलेले निवेदन चुकीचे आणि दिशाभूल करणारे असून, त्यांची चौकशी करून गरज पडल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचा इशारा संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिला आहे.

31 डिसेंबर 2014 रोजी मध्यरात्री भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयित पाकिस्तानी बोटीत आपणच स्फोट करून उडवून देण्यास सांगितलं होतं. बोटीवरच्या लोकांना पकडून त्यांना बिर्यानी खाऊ घालायची नव्हती, अशाप्रकारचं खळबळजनक वक्तव्य लोशली यांनी केल्याचे या वृत्तात म्हटलं आहे. मात्र, बी.के. लोशलींनी ही बातमी खोटी असल्याचं सांगत आपण अशा कोणत्याही प्रकारचा आदेश दिला नसल्याचा दावा केला आहे. मात्र लोशली यांनी यू-टर्न घेतल्यानंतर 'इंडियन एक्सप्रेस'ने त्यांच्या भाषणाचा एक व्हिडिओच प्रसिद्ध केला.

इंडियन एक्स्प्रेसने प्रसिध्द केलेल्या याच व्हिडिओच्या आधारे लोशली यांची चौकशी करण्यात येईल, असं संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पत्रकारांना सांगितलं. संशयित बोटीने स्वत:हून पेट घेतल्याच्या विधानावर पर्रिकर अजूनही ठाम आहेत. त्या बोटीवर दहशतवादी असल्याची माहिती त्यांनी याआधीच दिली होती. लोशली यांनी केलेले निवेदन चुकीचे आणि दिशाभूल करणारे असून, त्यांची चौकशी करून गरज पडल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असंही पर्रिकर यांनी स्पष्ट केलं आहे.

गुजरातच्या पोरबंदरच्या समुद्रात 31 डिसेंबर 2014 च्या रात्री पाकिस्तानी बोटीत स्फोट झाला होता. याप्रकरणी संरक्षण मंत्रालयाने 2 जानेवारीला माहिती दिली. यानुसार पाकिस्तानच्या बोटीला तटरक्षक दलाने थांबण्याचा इशारा दिला होता. मात्र बोटीने आपला वेग वाढवला आणि भारतीय सागरी सीमेपासून दूर पळण्यास सुरुवात केली होती. तटरक्षक दलाकडून गोळीबारही करण्यात आला होता. पण त्यानंतर बोटीत स्फोट झाला. 'बोटीवरील पाकिस्तानी लोकांनीच स्फोट केला होता', अशी माहिती त्यावेळी केंद्र सरकारकडून देण्यात आली होती. त्यामुळे लोशली यांचं वक्तव्य महत्त्वपूर्ण आणि गंभीर आहे.

Follow @ibnlokmattv

First published: February 18, 2015, 5:15 PM IST

ताज्या बातम्या