कोळसा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून मनमोहन सिंगांची चौकशी

  • Share this:

Manmohan singh20 जानेवारी : कोळसा खाण वाटपामुळे तत्कालिन यूपीए सरकारची चांगलीच नाचक्की झाली होती. या प्रकरणापासून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दोन हात दूर राहण्याचा प्रयत्न केला होता. पण, अखेरीस या प्रकरणाच्या चौकशीचा ससेमिरा मनमोहन सिंग यांच्या मागे लागलाय. दोन दिवसांपूर्वी रविवारी सीबीआयच्या टीमने मनमोहन सिंग यांच्या घरी तासभर चौकशी केल्याची माहिती समोर आलीये.

देशाला हादरावून टाकणार्‍या कोट्यवधीच्या कोळसा खाण वाटपामुळे तत्कालिन यूपीए सरकार चांगलंच अडचणीत आलं होतं. भाजपने या प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना टार्गेट केलं होतं. मनमोहन सिंग यांनी चौकशीला सामोरं जावं किंवा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली होती. मात्र, काँग्रेसने भाजपची मागणी फेटाळून लावली होती. पण आता भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर सीबीआयने कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी मनमोहन सिंग यांची चौकशी केलीये. सीबीआयने दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या घरी चौकशी केल्याचं कळतंय. हिंदाल्को कंपनीला दिलेल्या कोळशाच्या ब्लॉकबद्दल त्यांना विचारणा करण्यात आलीय. हिंदाल्कोला कोळसा ब्लॉक देण्यात आला त्यावेळी मनमोहन सिंग यांच्याकडे कोळसा खातं होतं. ऑक्टोबर 2013 मध्ये सीबीआयने पंतप्रधानांना एक पत्र पाठवले होते. या पत्रात 2005 मध्ये हिंदाल्कोला ओडिशामध्ये देण्यात आलेल्या कोळसा खाण वाटपासंबंधी फाईलींची मागणी करण्यात आली होती. मनमोहन सिंग यांच्या काळात या खाण वाटपांना मंजुरी देण्यात आली होती. या प्रकरणी सीबीआयाने आदित्य ब्रिला ग्रुपचे चेअरमन कुमारमंगलम ब्रिला आणि पूर्व कोळसा सचिव पी.के.पारख यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली होती. या एफआयआरनंतर पारख यांनी खाण वाटपाचा निर्णय मनमोहन सिंग यांनीच घेतला होता त्यामुळे त्यांना आरोपी बनवण्यात यावं असा दावाच केला होता. अखेरीस या प्रकरणी मनमोहन सिंग यांची चौकशी सुरू झाली असून आणखी दोन दिवसांत चौकशी होण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 20, 2015 11:55 PM IST

ताज्या बातम्या