दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

  • Share this:

A view of the Indian parliament building is seen in New Delhi

24 नोव्हेंबर : माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचे खासदार मुरली देवरा यांच्यासह निधन झालेल्या अन्य लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना श्रद्धांजली वाहत आज (सोमवारी) पहिल्याच दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार होते. पण, पहिल्याच दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये नुकत्याच दिवंगत पावलेल्या सदस्यांना आणि नैसर्गिक आपत्तींमध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले. त्यापूर्वी लोकसभेत नव्याने निवडून आलेल्या सदस्यांना शपथ देण्यात आली. यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या जागी निवडून आलेली त्यांची मुलगी प्रीतम मुंडे यांनी मराठीतून शपथ घेतली.

या अधिवेशनामध्ये केंद्र सरकार आपला आर्थिक अजेंडा पुढे करण्याची शक्यता आहे. तर सरकारच्या या अजेंड्याला विरोधी पक्षांकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरणार, अशी चिन्हं आताच दिसू लागली आहेत.

केंद्रात सत्तेवर आल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारचे हे दुसरे मोठे अधिवेशन आहे. मोठ्या प्रमाणावर आर्थिक बदल करणार असल्याचे सरकारने आधीच सूचित केले होते. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय बैठकीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशन काळात सर्वच प्रमुख मुद्द्यांवर एकमताने विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. जवळपास महिनाभर चालणारे हे अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशनाप्रमाणेच सुरळीत पार पडले, अशी आशा मोदींनी व्यक्त केली.

दरम्यान, मोदींनी बोलावलेल्या बैठकीला तृणमूल काँग्रेसने बहिष्कार टाकला होता, तर आज (सोमवारी) संसदेत धरणं धरणार असल्याचं ममता बॅनजीर्ंनी सांगितलं आहे. तसंच विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीलाही तृणमूलनं विरोध दर्शवला आहे. सीपीएम, जनता दल युनायटेड, बसप आणि समाजवादी पक्षानंही परकी गुंतवणुकीला परवानगी देण्यास विरोध केलाय. यावर योग्य तो विचार करू, असं भाजपने म्हटलं आहे. याशिवाय कोळसा खाण अध्यादेश आणि सेवाकर विधेयक मंजूर करण्यावर सरकारचं प्राधान्य असणार आहे. एकूण 37 विधेयकं या अधिवेशनात सादर करण्याचा सरकारचा मानस आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2014 12:29 PM IST

ताज्या बातम्या