पोलिसांचं मिशन फत्ते, अखेर बाबा रामपाल गजाआड

  • Share this:

babarampal_arrest19 नोव्हेंबर : : अखेर स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू बाबा रामपालला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय.   हिसार पोलिसांनी आश्रमात घुसून थेट कारवाई केली आणि 36 तासांच्या थरारानाट्यानंतर बाबा रामपालच्या मुसक्या आवळल्यात. उद्या चंदिगड कोर्टात बाबाला हजर करण्यात येणार आहे. अतिशय नाट्यमयरित्या हे संपूर्ण ऑपरेशन राबवण्यात आलं. हिसार पोलिसांनी आश्रमात जाऊन बाबाला अटक केली आणि ऍम्बुलन्समधून त्याला चंदिगडला नेण्यात आलं. बाबा रामपाल खुनाच्या खटल्यात आरोपी होता. कोर्टाने अटक वॉरंट बजावूनही तो शरण येत नव्हता. अखेर 36 तासांच्या प्रयत्नांनंतर त्याला अटक करण्यात यश आलं.त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. मात्र या हिंसाचारात 6 जणांना आपला जीव गमवावा लागलाय.

कुरुक्षेत्राजवळच्या हिसर जिल्ह्यात...मंगळवारी नव्या महाभारताला सुरुवात झाली. अटक टाळण्यासाठी आश्रमात लपलेल्या बाबा रामपालला पकडण्यासाठी पोलिसांच्या टीम्स भल्या सकाळी पोहोचल्या. बाबाच्या सशस्त्र समर्थकांनी पोलिसांवर सुरुवातीला तूफान दगडफेक केली. नंतर पोलिसांनी त्यांच्यावर जोरदार लाठीमार केल्यावर...आश्रमातून चक्क गोळ्यांच्या फैरी झडल्या. दुपारनंतर या चकमकीचं जणू लढाईत रूपांतर झालं. बाबाचे प्रशिक्षित आणि सशस्त्र असे 4 हजार जवान आणि सुमारे 15 हजार समर्थकांनी जोरदार किल्ला लढवला. पण आतमध्ये महिला आणि मुलं असल्यामुळे पोलीस पूर्ण ताकदीनिशी हल्ला करू शकत नव्हते.

बाबापर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरलेल्या हरियाणा पोलिसांनी पत्रकारांनाच निशाणा केलं. हतबल पोलिसांनी संध्याकाळी दिवसभरापुरती माघार घेतली. दिवसभरात सुमारे 130 लोक आणि 70 पत्रकार जखमी झाले. बुधवारी सकाळी लक्षात आलं की मंगळवारच्या या चकमकीत 5 महिला आणि एका लहानग्याचा मृत्यू झाला. चकमक थांबल्यानंतर...12 एकर परिसरात पसरलेल्या आणि तटबंदीने राखलेल्या या अवाढव्य आश्रमातून समर्थक बाहेर पडू लागले. पाहता पाहता...सुमारे 10 हजार समर्थक बाहेर पडले. बाबा आत नाही आहेत, असा दावा या भक्तांनी केला.

गेल्या 12 दिवसांपासून पोलीस बाबाबद्दल गुप्तचर विभागाकडून माहिती मिळवत होतं. बाबा आश्रमातच दडून बसलाय आणि तो पकडला जात नाही, तोवर कारवाई सुरूच राहणार, अशी कडक भूमिका आता पोलिसांनी घेतलीये.

आश्रमात शिरण्यासाठी आता आश्रमाची तटबंदी फोडावी लागणार आहे. त्यासाठी मोठाले जेसीबी मशिन्स आणण्यात आलेत. निरपराध

लोक बाहेर पडले की, हल्ला करण्याचा आता पोलिसांचा बेत होता. पण बाबा निरपरधांनाच ओलीस धरेल, अशी त्यांना भीती होती. अखेरीस रात्री पोलिसांनी मोहिम आणखी आक्रमक केली. निमलष्कर दलाचे जवान आणि पोलिसांनी आश्रमावर हल्लाबोल केला. 36 तास चाललेल्या या नाट्यानंतर रामपालने नरमाईची भूमिका घेतली आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. रामपालला उद्या हिसारच्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पण आडमुठ्या या रामपाल बाबामुळे 6 जणांना जीव गमवावा लागला.

पोलिसांचे नाईट ऑपरेशन

रामपालच्या आश्रमामध्ये पोलिसांचे नाईट ऑपरेशन सुरू झालंय. रामपालच्या आश्रमाजवळ अनेक गाड्यांना आग लावण्यात आलीये. या गाड्या कुणी पेटवल्या याचा तपास पोलीस करत आहे. आश्रमाबाहेर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आलाय. केंद्रानंही पॅरामिलिटरी दलाचे 500 जवान हिसारमध्ये पाठवले आहेत. हिंसाचार करणार्‍या 425 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

रवीशंकर यांनी सुनावले रामपाल बाबाला खडेबोल

दरम्यान, अध्यात्मिक गुरू श्री.श्री.रवीशंकर यांनी या रामपाल बाबाला खडेबोल सुनावलेत. त्यांनी याबद्दल ट्विट केलंय. ते म्हणतात, 'मी रामपाल बाबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानं सारासार विचार करावा यासाठी मी फोन करत होतो. त्याच्या सेक्रेटरीने पहिल्यांदा त्याला फोन जोडून द्यायचं मान्य केलं, पण नंतर फोन कट केला. आपण कायद्यापेक्षा मोठे नाही हे नेत्यांनी लक्षात घ्यावं. साधेपणा आणि त्यागानेच काम करायला हवं.'

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 19, 2014 10:46 PM IST

ताज्या बातम्या