निवडणुकीचे बिगुल वाजले, 15 ऑक्टोबरला मतदान 19 ला मतमोजणी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2014 11:24 PM IST

election 2014 

12 सप्टेंबर : वाजणार...वाजणार...निवडणुकीचे बिगुल वाजणार...या घोषणेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेल होते अखेर ती समीप घटीका आलीये. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. 15 ऑक्टोबरला मतदान आणि 19 तारखेला मतमोजणी होणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस. संपत यांनी केलीये. त्यामुळे निवडणुकीसाठी आजपासूनच आचारसंहिता लागू झालीये. आता दिवाळीआधीच नवं सरकार सत्तेवर विराजमान होणार हे निश्चित झालं असून कुणाची 'दिवाळी' साजरी होणार आहे तर कुणाचं दिवाळं निघणार हे पाहण्याचं ठरणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेची मुदत 8 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र आता 12 व्या विधानसभेला निरोप देऊन 13 व्या विधानसभेला सामोरं जाणार आहे. गेल्या दोन आठवड्यापासून निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर त्या तारखा आज जाहीर झाल्यात. मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस.संपत यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.

15 ऑक्टोबरला विधानसभेसाठीचं मतदान, तर 19 ऑक्टेबरला मतमोजणी होणार आहे. संपूर्ण राज्यासाठी एकाच टप्प्यात हे मतदान होणार आहे. 27 सप्टेंबर ही अर्ज भरण्यासाठीची शेवटची तारीख आहे. तर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर आहे. 15 ऑक्टोबरला मतदान होऊन दिवाळीपूर्वी म्हणजे 19 तारखेला निकाल लागणार आहे. 15 ऑक्टोबरला बीडमध्ये लोकसभेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

महाराष्ट्रासोबतच हरियाणातही 15 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. राज्यात विधानसभेसाठी 8 कोटींपेक्षाही जास्त मतदार 90 हजारांपेक्षा जास्त मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर विधानसभेसाठीही नोटा पर्याय उपलब्ध असेल. निवडूक खर्चावर निवडणूक आयोग लक्ष ठेवून असणार आहे, असंही संपत यांनी सांगितलंय. तसंच 20 तारखेला निवडणुकीची अधिसूचना निघणार आहे. प्रत्येक उमेदवारांनी आपलं अर्ज भरताना संपूर्ण रकाने भरणे बंधनकारक आहे असंही संपत म्हणाले. तसंच मतदार याद्यांमध्ये होणारा घोळ टाळण्यासाठी अखेरच्या दिवसापर्यंत मतदारांची नोंदणी केली जाणार असून यासाठी विशेष मोहिम राबवली जाणार असल्याचं संपत यांनी सांगितलं.

Loading...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम

  • अर्ज भरणे - 20 ते 27 सप्टेंबर
  • अर्ज छानणी - 29 सप्टेंबर
  • अर्ज मागे घेणे - 1 ऑक्टोबर
  • मतदान - 15 ऑक्टोबर आणि
  • मतमोजणी - 19 ऑक्टोबर

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2014 05:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...