मोदींचा असाही आदेश, आपलं भाषण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 30, 2014 04:29 PM IST

modi in nagpur program30 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या एका आदेशामुळे वादात सापडण्याची शक्यता आहे. येत्या 5 सप्टेंबर, म्हणजे शिक्षक दिनी मोदींचं भाषण देशातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, असे आदेश केंद्र सरकारने काढले आहे.

शिक्षक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण होणार आहे. त्याचे थेट प्रक्षेपण राज्यातील प्रत्येक शाळेत केले जाणार असून तशा प्रकारचे आदेश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने काढले आहेत. पंतप्रधानांचे हे थेट भाषण विद्यार्थ्यांना ऐकता यावे यासाठी टीव्हीपासून ते आसन व्यवस्थेची जबाबदारी मुख्याध्यापकाची असणार आहे.

ज्या शाळेत टीव्ही नसेल किंवा अधिक विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या शाळांमध्ये उसनवारीवर टीव्ही बसविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. याबाबत राज्यांच्या शिक्षण सचिवांना सोमवारपर्यंत संपूर्ण योजनेबद्दल केंद्राला कळवायचंय. त्यानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सचिव अश्विनी भिडे यांनी निर्देश दिले आहे.

शिक्षक दिनी दुपारी 3 ते 4.45 या वेळेत पंतप्रधानांचे भाषण होईल. यानंतर मोदींचं भाषण किती विद्यार्थ्यांनी ऐकलं, याबाबतचा अहवालही केंद्रानी मागितला. इंटरनेटद्वारेही मोदींच्या भाषणाचे प्रक्षेपण केले जाणार आहे, ज्या शाळांमध्ये आयसीटी योजना आहे तिथे प्रोजेक्टर्सचा वापर करण्याच्या सूचना आहेत. तर दुर्गम भागात रेडिओद्वारे प्रसारण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पण ज्या शाळांमध्ये टीव्हीची सोय नाही, त्या शाळांनी काय करायचं, असा प्रश्न आता निर्माण झालाय.

मात्र मोदींच्या या आदेशामुळे विरोधकांनी नाराजी व्यक्त केलीय. विद्यार्थ्यावर अशी सक्ती करणे योग्य नाही असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हटलंय. तर मोदी हिटलरशाहीच्या वाटेवर आहेत. मोदी एकाधिकारशाही राबवत आहेत त्यामुळे भारताच्या लोकशाहीलाच धोका निर्माण होईल. ही फक्त सुरुवात आहे, आणखी बरंच काही बघावं लागेल अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि वैद्यकीय शालेय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2014 12:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...