29 जुलै : दिल्लीतील महाराष्ट्र सदनात चपाती राड्याप्रकरणी आता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अडचणीत आले आहेत. महाराष्ट्र सदनात शिवसेनेच्या खासदार राजन विचारे यांनी राडा करताना मॅनेजरच्या तोंडात जबरदस्तीनं पोळी कोंबून त्याचा रोजा तोडण्याचा प्रयत्न केला, असा स्पष्ट ठपका महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त बिपीन मलिक यांनी ठेवलाय.
ही घटना ज्या दिवशी घडली त्याच दिवशी बिपीन मलिक यांनी मुख्यमंत्र्यांच्या खाजगी सचिव आणि प्रधान सचिवांना या घटनेची माहिती दिली होती. तसंच दुसर्या दिवशी म्हणजेच 18 जुलैला मलिक यांनी आपला गोपनीय अहवाल मुख्य सचिव जे एस सहारिया, शिष्टाचार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुमित मलिक आणि मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवला.
एवढंच नाही तर 20 जुलैला प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांना या घटनेची माहिती दिली. त्याच वेळी शिवसेना खासदारांच्या विरुद्ध एफआयआर दाखल केला गेलेला नाही याचीही कल्पना मुख्यमंत्र्यांना दिली. त्यानंतर 22 जुलैला बिपीन मलिक यांना मुंबईत बोलवून घेण्यात आले. अखेर 6 व्या दिवशी म्हणजे 23 जुलैला मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या राड्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.
पण प्रत्यक्षात बिपीन मलिक यांनी घटनेच्या दुसर्याच दिवशी आपला चौकशी आणि दोषारोपण अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठवला होता. तरीसुद्धा चौकशीचे आदेश द्यायला मुख्यमंत्र्यांनी 6 दिवस लावल्याचं उघड झालंय. त्यामुळे पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचीच बाजू घेतल्याची चर्चा सुरू झालीये.दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेची बाजू घेतल्याच्या आरोपाचं खंडन केलंय.
मुख्यमंत्र्यांनी साधला भुजबळांवर निशाणा
तर महाराष्ट्र सदनावरून मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांना टोला लगावलाय. सदनाच्या विकासकाने अनेक गोष्टी अपूर्ण ठेवल्या आहेत, असं म्हणत त्यांनी चमणकर या भुजबळांच्या जवळच्या सहकार्यावर खापर फोडलंय. या प्रकरणात जो दोषी आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी, असं त्यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखत म्हटलंय.
Follow @ibnlokmattv |