अखेर वरुणराजे हसले, देशभरात बरसले !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2014 08:47 PM IST

अखेर वरुणराजे हसले, देशभरात बरसले !

453mansoon16 जुलै : अखेर वरुणराजे प्रसन्न झाले असून संपूर्ण देशात बरसण्यास सुरूवात केलीय. देशात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झालाय. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, पूर्व राजस्थान, हिमाचल, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आणि हा यंदाच्या मान्सूनमधला सर्वोत्तम पाऊस सध्या सुरू असल्याचं हवामान खात्याने सांगितलंय. संपूर्ण भारतात येत्या 5 दिवसांत जोरदार पावसाची शक्यता असून मान्सूनची तूट भरुन निघणार आहे. उर्वरित जुलै महिन्यात उत्तम पर्जन्यमान असल्याचा हवामान खात्याने गोड अंदाज व्यक्त केला आहे.

एल निनो वादळाचा भारतीय हवामानाला फटका बसणार अशी दाट शक्यता होती. याचे परिणाम जून महिन्यात पाहण्यास मिळाले. एल निनोमुळे महिनाभर मान्सून उशिराने दाखल झाला. कोकण आणि मुंबई या समुद्रकिनार्‍या लगत पावसाने हजेरी लावली पण देशभरात पुढे मान्सून सरकला नाही. त्यामुळे राज्यभरावर दुष्काळाचे संकट घोंघावत होते. राज्यातील अनेक ठिकाणी पाणीकपात करण्यात आलीय.

तर पाऊसच नसल्यामुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय. मात्र अखेर जुलैच्या मध्यात वरुणराजे देवासारखे धावून आले आहे. संपूर्ण देशभरात येत्या पाच दिवसात भरपूर पाऊस पडणार असा शुभ अंदाज हवामान खात्यांने व्यक्त केला.

मुंबई धो-धो

दरम्यान, मुंबई आणि कोकणात पावसाने आपला मुक्काम वाढवला आहे. मुंबईसह उपनगरात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. समुद्राला उधाण आले असून लाटांचे तांडव सुरू आहे. तर दुसरीकडे पावसामुळे नेहमी प्रमाणे मुंबईत सखल भागात पाणी साचलं होतं. भायखळ्यातील लवलेन बीआयटी चाळ, वरळी बीडीडी चाळ, लालबाग, परळ-हिंदमाता, मिलन सबवे, खार सबवे या सखल भागात सकाळी पाणी साचलं होतं.

Loading...

वसईत जनजीवन विस्कळीत

वसई विरार परिसरात सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. नालासोपारा विभागात सर्वत्र पाणीच पाणी आहे. या विभागातील संतोष भवन परिसरातल्या अन्नाडीस कम्पाउंड परिसरात गेल्या दोन दिवसापासून 100 कुटुंब पाण्याखाली आहेत. गेल्या तीन दिवसाच्या पावसामुळे सर्व रहिवाश्यांच्या घरात पाणी शिरलंय. एकीकडे पावसाचा जोर कमी होत नाहीये तर दुसरीकडे प्रशासनाकडूनही मदत मिळत नसल्याने रहिवासी हैराण झालेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं असल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणताही मार्ग नाही.

कोल्हापुरात संततधार

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 418 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील 10 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चंद्रपूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू झालाय. या पावसाचा सर्वाधिक फटका चिमूर तालुक्याला बसलाय. चिमूरमध्ये सर्वाधिक 235 मि.मि.पाऊस मंगळवारी 24 तासांत पडलाय. उमा नदी दुथडी भरुन वाहतेय. कोकणातही पावसाचा जोर कायम आहे. रायगड जिल्ह्यात कर्जत, माथेरान,खोपोली,उरण,पोलादपूरमध्ये संततधार आहे.

चंद्रपूरला  फटका

गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका चिमूर तालुक्याला बसला आहे. गेल्या 24 तासांत चिमूरमध्ये सर्वाधिक 235 मिमि पाऊस झाला आहे. काल 24 तासांत पडलाय. उमा नदी दुथडी भरून वाहत असल्यानं काल रात्रीपर्यंत चिमूर-चंद्रपूर, चिमूर-हिंगणघाट आणि चिमूर-नागपूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे. त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक रात्री उशिरापर्यंत बंद होती. रस्ता बंद झाल्यानं अनेक ठिकाणी प्रवासी अडकून पडले होते. कारपाटा, केसलापार, सिरपूर अशा अनेक गावांचा तालुका मुख्यालयापासून संपर्क तुटला होता.

रत्नागिरी : जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये रात्रीपासून पाऊस सुरू असून वसिष्ठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2014 07:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...