राष्ट्रपतीभवन सज्ज, मोदी घेणार आज शपथ !

राष्ट्रपतीभवन सज्ज, मोदी घेणार आज शपथ !

 • Share this:

tmp_14010385157831705980590

26 मे : लोकसभा निवडणुकीचा आखाडा एकहाती जिंकल्यानंतर भाजपचे नेते नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 6 वाजता दिमाखदार सोहळ्यात पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्याची दिल्लीत सकाळपासून लगबग सुरू आहे. नरेंद्र मोदी यांनी सकाळी राज घाटावर जाऊन गांधींजींच्या समाधीस्थळावर आदरांजली वाहिली. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे मंत्रिमंडळाची अंतिम यादी पाठवली.

कार्यक्रम देखणा आणि भव्य व्हावा यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. तसंच खबरदारीचा उपाय म्हणून दरबार हॉलही सज्ज ठेवण्यात आला आहे. शपथविधीची वेळ संध्याकाळची असल्याने लक्षवेधी प्रकाशयोजनाही करण्यात आली आहे. जवळपास 3 हजार जण या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. शपथविधीनंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सार्क देशांचे राष्ट्रप्रमुख आणि निवडक निमंत्रीतांसाठी मेजवानी देणार आहेत.

कडेकोट बंदोबस्त

राष्ट्रपती भवनात सुरक्षा व्यवस्थाही कडेकोट ठेवण्यात आलीये. त्यासाठी दिल्लीतल्या तब्बल 7000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली पोलीस, सीआरपीएफ, पॅरामिलिटरी दल, एसपीजी आणि एनएसजी या सुरक्षा दलांचा या सुरक्षा व्यवस्थेत सहभाग आहे. तर लष्कर आणि वायुसेनेचीही यात मदत घेण्यात येतेय. वायू सुरक्षा यंत्रणा कार्यरत करण्यात आलीय, विमानभेदी बंदुकाही तैनात करण्यात आल्या आहेत. वायू सेनेनं लढाऊ विमानंही तयार ठेवली आहे आणि एखादं प्रवासी विमान हवेत असताना त्यात इंधन भरणारी विशेष विमानंही तयार आहेत.

राष्ट्रपती भवनाजवळची कार्यालये आज दुपारी एक वाजता बंद करण्यात येणार आहे तर संध्याकाळी 5 वाजेपासून राष्ट्रपती भवनाजवळचे सर्व रस्ते वाहतूकासाठी बंद होतील. संध्याकाळी सहा वाजल्यापासून राष्ट्रवती भवनावरून जाण्याची कोणत्याही विमानाला परवानगी मिळणार नाही. आजच्या समारंभातल्या तीन व्यक्तींच्या जीवाला सर्वात जास्त धोका आहे. हे तीन लोक म्हणजे नरेंद्र मोदी, नवाझ शरीफ आणि श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे..या कारणामुळेही ही अभूतपूर्व सुरक्षा ठेवण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान झाल्यानंतर मोदी आज रात्री 7 रेसकोर्स या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी राहण्यासाठी जाणार आहेत. त्यांना आज सकाळपासून पंतप्रधानांना मिळणारी सुरक्षा पुरवली जातेय.

मोदी राजघाटावर

भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे नेते हर्ष वर्धन होते. मोदींचा मुक्काम गुजरात भवनमध्ये होता. तिथून ते सकाळी पावणेआठच्या सुमाराला राजघाटासाठी निघाले. तिथं गेल्यावर त्यांनी बापूजींच्या समाधीला प्रणाम केला, तिथं जमलेल्या लोकांना अभिवादन केलं. त्यानंतर तिथल्या हिरवळीवर थोडा वेळ ते बसले. पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी राजघाटावर आदरांजली वाहण्याची परंपरा आहे.

शपथविधी सोहळ्याचा मेन्यू

शाकाहारी आणि मांसाहारी

अल्पोपाहार

 • मूगडाळीची कचोरी
 • ढोकळा
 • टार्टस्
 • कुकीज
 • सँडविच
 • इमरती (गोड पदार्थ)
 • काही ठराविक पाहुण्यांसाठी कबाबची सोय

रात्रीचं जेवण

 • मेलन सूप
 • चिकन, मटण, स्टार्टर्स, अरबी कबाब आणि तंदूरी आलू

मुख्य जेवण

 • प्रॉन स्ट्यू
 • चिकन चेट्टीनाड
 • बिरबली कोफ्ता करी
 • जयपुरी भेंडी
 • केळी-मेथीची गुजराती भाजी
 • परवराची बंगाली पद्धतीने भाजी
 • चपातीचे विविध प्रकार

गोड पदार्थ

 • अननसचा हलवा
 • आम्रखंड
 • संदेश
 • विविध फळं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2014 11:48 AM IST

ताज्या बातम्या