मोदींचा मास्टर प्लॅन, छोटी टीम बडा धमका ?

मोदींचा मास्टर प्लॅन, छोटी टीम बडा धमका ?

  • Share this:

43narendra_modi_team_news

23 मे : भाजपचे नेते नरेंद्र मोदी सोमवारी देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. पण दुसरीकडे भाजपमधली मंत्रिमंडळाची चर्चाही आता अंतिम टप्प्यात पोचलीय. मोदींचं मंत्रिमंडळ कसं असेल याबाबत सगळीकडेच उत्सुकता आहे. पण, मंत्रिमंडळ छोटं ठेवण्यावर मोदींचा भर आहे. राज्यमंत्री मात्र जास्त असतील. शिवाय राज्यमंत्र्यांवर अधिक जबाबदारीही सोपवण्याचा मोदींचा विचार आहे. गृह, कृषी, परराष्ट्र आणि वाणिज्य मंत्रालयांच्या कामकाजात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

भाजप नेते अरुण शौरी यांनी आज सीएनएन आयबीएनला खास मुलाखत दिलीय. या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदींचं मंत्रिमंडळ कसं असू शकेल याची थोडीशी कल्पना अरुण शौरींनी दिलीय. मोदींच्या मंत्रिमंडळात 15 ते 20 पेक्षा जास्त कॅबिनेट मंत्री नसतील. काही मंत्रालयांचं विलिनीकरण करुन एकच मंत्रालय बनवण्याचा विचार मोदींचा आहे. तसंच वरिष्ठ मंत्र्याच्या नेतृत्त्वाखाली राज्यमंत्र्यांना विशिष्ट जबाबदारी सोपण्यात येईल.

त्याचबरोबर महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम करण्यासाठी विशेष सल्लागारांची कोअर कमिटीही नेमण्यात येईल. ही समिती थेट पंतप्रधान कार्यालयाच्या संपर्कात असेल आणि सध्या अस्तित्वात असलेले अनेक मंत्रीगट बरखास्त करण्यात येईल. यामुळे सध्या अस्तित्वात असलेले डझनवारी मंत्रीगटही बरखास्त होण्याची शक्यता आहे.

कसं असणार मोदींचं मंत्रिमंडळ ?

  • - नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात 15 ते 20 पेक्षा जास्त कॅबिनेट मंत्री नसतील
  • - काही मंत्रालयांचं विलिनीकरण करून एकच मंत्रालय बनवणार
  • - वरिष्ठ मंत्र्याच्या नेतृत्त्वाखाली राज्यमंत्र्यांना विशिष्ट जबाबदारी सोपण्यात येईल
  • - महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम करण्यासाठी विशेष सल्लागारांची कोअर कमिटी नेमण्यात येईल.
  • - ही समिती थेट पंतप्रधान कार्यालयाच्या संपर्कात असेल
  • - सध्या अस्तित्वात असलेले अनेक मंत्रीगट बरखास्त करणार

सीएनएन आयबीएनचे मुख्य संपादक राजदीप सरदेसाई यांनीअरुण शौरींची एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदींचं मंत्रिमंडळ कसं असू शकेल याची थोडीशी कल्पना अरुण शौरींनी दिलीय. मोदींचं मंत्रिमंडळ जम्बो मंत्रिमंडळ नसेल आणि सध्याच्या मंत्रिमंडळाच्या जवळ-जवळ निम्मं असेल असं शौरींनी सांगितलंय. या मुलाखतीचा हा भाग...

राजदीप सरदेसाई - भाजपमध्ये सध्या एकच चर्चा होतेय. मोदीही लहान मंत्रिमंडळ आणि जास्त कारभार याबद्दल सांगत आहे. त्याचा नेमका अर्थ काय होतो ? आता कधीही मंत्रिमंडळ स्थापन होऊ शकतो ? तुम्ही वाजपेयींच्या मंत्रिमंडळात होतात. तिथे 80 मंत्री होते. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात पण तेच झालं. आपल्याला थोडं लहान, कमी मंत्री असलेलं मंत्रिमंडळ जे कामावर अधिक लक्ष देऊ शकेल असं मंत्रिमडळ आवश्यक आहे का ?

अरुण शौरी- मला वाटतं मोदींसाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यात पहिली कल्पना हीच आहे की, मंत्रालयाचं विलिनीकरण करणं. एकाच छत्राखाली अनेक खाती आणणं.

राजदीप सरदेसाई - उदाहरण द्या..

अरुण शौरी- ऊर्जा मंत्रालय, कोळसा, खाणी, अणुऊर्जा वगळता इतर सगळी अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयं यासाठी राज्यमंत्र्यांची नियुक्ती करा आणि सात कॅबिनेट मंत्र्यांऐवजी एकाच कॅबिनेट मंत्र्यांची नियुक्ती करा असंच वाहतूक मंत्रालयासाठीही करणं शक्य आहे.

राजदीप सरदेसाई- म्हणजे रेल्वे, रस्ते वाहतूक यांचा एकाच मंत्रालयात समावेश करणार का ?

अरुण शौरी- रेल्वे खूप मोठा विभाग आहे

राजदीप सरदेसाई- पण मग इतर वाहतूक खाती एकाच मंत्रालयाखाली आणणार का ?

अरुण शौरी- कामात वेग आणण्यासाठी समन्वय आवश्यक आहे. रोड आणि रेलमध्ये समन्वय आवश्यक असतं मंत्रिमंडळाची आकार कमी करण्याची कल्पना राघव बेहेल यांच्याकडून मिळाली. नायक समितीने बँकांना एकत्र करून त्यांना एका मुख्य कंपनीखाली आणायला हवं हा सल्ला दिला होता. राघव बेहेल यांनी सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांना मंत्रालयाच्या कारभारापासून वेगळं केलं पाहिजे आणि त्यांना एका छत्राखाली आणलं पाहिजे.

असं होतं अटल बिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळ

वाजपेयींचं मंत्रिमंडळ (1999)

केंद्रीय मंत्री - 29

स्वतंत्र कारभार - 8

राज्यमंत्री - 41

डॉ. मनमोहन सिंग यांचं मंत्रिमंडळ (2009)

केंद्रीय मंत्री - 28

स्वतंत्र कारभार - 11

राज्यमंत्री - 32

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2014 11:04 PM IST

ताज्या बातम्या