मोदी जिंकले, यूपीए भुईसपाट

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 16, 2014 10:09 PM IST

मोदी जिंकले, यूपीए भुईसपाट

Modi_1583674g

16 मे :नरेंद्र मोदींच्या लाटेवर स्वार होत भाजप आणि एनडीएला ऐतिहासिक यश मिळालंय. 1984 मध्ये काँग्रेसला मिळालेल्या दणदणीत बहुमतानंतर पहिल्यांदाच एका पक्षाला बहुमत मिळतंय. सर्व अर्थांनी ही निवडणूक ऐतिहासिक ठरली. एनडीएनं 330चा टप्पा ओलांडलाय तर एकट्या भाजपने 272चा जादुई आकडा एकट्याच्या बळावर पार केलाय. महत्त्वाच्या राज्यांमध्येही भाजपने चमकदार कामगिरी केलीय. सर्वात मोठ्या उत्तर प्रदेशात 80 पैकी 73 जागा भाजपने बळकावल्यायत.

 

महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश राज्यांमध्येही भाजपची क्लीन स्वीप आहे. मोदींच्या या झंझावात काँग्रेसचा सुपडा साफ झालाय. सोनिया गांधी, राहुल गांधींसह जेमतेम 50 उमेदवार निवडून आले आहेत. मावळते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग उद्या पदाचा राजीनामा देतील. प्रादेशिक पक्षांसाठीही कसोटीचा काळ आहे. दक्षिणेत जयललिता आणि उत्तरेत ममता बॅनर्जी, नवीन पटनाईक यांनाच आपले गढ राखता आलेत. डाव्यांची दयनीय स्थिती झालीय.

 

Loading...

पश्चिम बंगालच्या जेमतेम 3 जागांसह डाव्यांना एकूण 11 जागा जिंकता आल्या आहेत. मायावतींचा बहुजन समाज पक्ष, करुणानिधींचा द्रमुक आणि फारुख अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरंस या पक्षांना तर खातही उघडता आलेलं नाही. मोदींनी बडोद्यातून 5 लाख 70 हजार मतांनी विजय मिळवला. 21 मे रोजी मोदींचा शपथग्रहण समारंभ होण्याची शक्यता आहे.

एकच जल्लोष

मोदींचा विजय साजरा करण्यासाठी भाजपनं आधीपासूनच तयारी पूर्ण केली होती. आज सकाळी मतमोजणी सुरू होताच भाजप नेते आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. दिल्लीतल्या भाजप कार्यालयापासून, गांधीनगर, अहमदाबाद, मुंबई आणि देशभरातल्या कार्यालयाबाहेर फटाके उडवून, लाडू वाटून आनंद साजरा करण्यात आला. भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर, मुख्तार अब्बास नक्वी यांनी ढोल ताशे वाजवून तर दिल्लीतले भाजप उमेदवार हर्षवर्धन यांनी चक्क नाचून आनंद साजरा केला.

जनतेच्या अपेक्षा मोदी पूर्ण करतील - संघ

जनतेच्या अपेक्षा मोदी पूर्ण करतील, अशी आशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं व्यक्त केलीय. पक्षाचे काम संघाच्या आदेशावर चालतं, अशी टीका नेहमीच होते. पण, कुठलंही सरकार जर रिमोट कंट्रोलवर चालत असेल तर ते लोकशाहीसाठी घातक आहे, असं म्हणत भय्याजी जोशी यांनी या टीकेला उत्तर दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2014 06:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...