06 मे : अमेठीमध्ये 'आप'चे उमेदवार कुमार विश्वास यांची काल रात्री पोलिसांबरोबर वादावादी झाली. पोलिसांनी आपल्या समर्थकांना त्रास दिल्याचा आरोप कुमार विश्वास यांनी केला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदारसंघाबाहेरच्या कार्यकर्त्यांना प्रचार संपल्यानंतर अमेठीबाहेर जायला सांगण्यात आलं आहे.
'आप'चे नेते कुमार विश्वास यांच्या कुटूंबियांना अमेठी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कुमार विश्वास यांच्या कुटूंबातील एकही सदस्य नोंदणीकृत मतदार नसल्याचे कारण जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. पोलिसांनी विश्वास यांच्या पत्नीला अटक करण्याची धमकी दिली. त्या नोंदणीकृत मतदार नसल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस, भाजप आणि 'आप'च्याही कार्यकर्त्यांना हा आदेश देण्यात आलाय. कार्यकर्ते अमेठी सोडून न गेल्यास त्यांना अटक करण्याची धमकी देण्यात आली आहे. काँग्रेस आणि भाजप सोडून पोलीस 'आप'ला लक्ष्य करत असल्याचा आरोप कुमार विश्वास यांनी केला. मात्र, निवडणूक आयोगाच्या आदेशावरूनच काम करत असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.