केजरीवाल वाराणसीच्या रिंगणात, मोदींना खुल्या चर्चेचं आव्हान

केजरीवाल वाराणसीच्या रिंगणात, मोदींना खुल्या चर्चेचं आव्हान

  • Share this:

varansi_kejriwal_25 मार्च : नरेंद्र मोदी विकासपुरूष वगैरे काही नाही, त्यांचा खोटा प्रचार केला जातोय. काँग्रेस आणि भाजप यांची छुपी हातमिळवणी झाली असून दोन्ही पक्ष देशाला लूटत आहे. त्यामुळे यांना धडा शिकवण्यासाठी आपण वाराणसीमधून निवडणूक लढवणार असल्याचं आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलं.

 

तसंच नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडणूक लढवत आहे, मीही इथून लढवत आहे. त्यामुळे मोदींनी माझ्यासोबत खुल्या मैदानात चर्चा करावी असं जाहीर आव्हानही केजरीवाल यांनी मोदींना दिलंय.

 

वाराणसीत झालेल्या भव्य सभेत केजरीवाल यांनी काँग्रेस आणि भाजपवर जोरदार तोफ डागली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात भाजप आणि मनसेची हातमिळवणी झाली अशी टीकाही केली. आपल्याकडे पैसा नसून आपण जनतेच्या पैशांवरच निवडणूक लढवणार असंही केजरीवाल यांनी स्पष्ट केलं.

दिल्लीचे तख्त सोडल्यानंतर आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली. लोकसभेच्या रिंगणात केजरीवाल यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना टार्गेट केलंय. भाजपने वाराणसीमधून नरेंद्र मोदी यांना उमेदवारी जाहीर केली. मोदी यांना उमेदवारी जाहीर होताच केजरीवाल यांनी वाराणसीतून निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं. आज (मंगळवारी) केजरीवाल जनतेचा कौल घेण्यासाठी वाराणसीत दाखल झाले. संध्याकाळी झालेल्या सभेत केजरीवाल यांनी काँग्रेस-भाजपवर जोरदार तोफ डागली.

आम्ही गुजरातमध्ये गेलो असताना नरेंद्र मोदींच्या समर्थकांनी आमच्यावर हल्ला केला. वाराणसीत आलो तर आमच्यावर काळी शाई फेकली, कुमार विश्वास अमेठीत गेले तेव्हा त्यांच्यावर हल्ला केला. पण भाजपवाल्यांनी कधी सोनिया गांधी, राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवले आहे का ? किंवा काँग्रेसवाल्यांनी भाजपच्या नेत्यांना काळे झेंडे दाखवले का ? असं कधी झालं नाही पण आम्ही जिथे जातो आमच्यावर हल्ले होता, काळे झेंडे दाखवले जातात आम्ही इतके मोठे शत्रू झालोय का ? दोघांच्या या विरोधामुळे याच्यात हातमिळवणी झालीय हे स्पष्ट झालंय अशी टीका केजरीवाल यांनी केली.

मोदींच्या सभेला अंबानी-अदानींचा पैसा

तसंच 1 एप्रिलला मुकेश अंबानींच्या सांगण्यावरून गॅसच्या दरात वाढ करण्यात येणार होती. पण ऐन निवडणूकांच्या तोंडावर काँग्रेसला माघार घ्यावी लागली. अन्यथा 1 एप्रिलला महागाईचा विस्फोट झाला असता असंही केजरीवाल म्हणाले. मोदी आणि राहुल मुकेश अंबानी आणि अदानींसारख्या उद्योजकांच्या खिश्यात आहे. त्यांच्या प्रचारासाठी मुकेश अंबानी आणि अदानी पैसा पुरवत आहे. जर पैसा पुरवत नसतील तर मोदी आणि राहुल यांच्या एवढ्या भव्य सभा कशा होतात? हेलिकॉप्टरने सभांना कसं जाता येतं? मुळात अंबानी आणि अंदानी हे दोघेही उद्योजक भाजप आणि काँग्रेसला पैसा पुरवत आहे असा गंभीर आरोपही केजरीवाल यांनी केला.

मोदी विकासपुरुष नाही

नरेंद्र मोदी गुजरातच्या विकासबद्दल कितीही दावे करत असले तरी ते विकासपुरुष मुळीच नाही. त्यांचा खोटा प्रचार केला जात आहे. गुजरातमध्ये खरी परिस्थिती कधी समोरच येऊ दिली नाही. काँग्रेस एफडीआय आणू पाहत आहे आता मोदींही एफडीआयसाठी पुढे सरसावले आहे. पण यामुळे छोट्या दुकानदारांचं मोठं नुकसान होणार आहे. मोठे व्यवसाय, उद्योग हे अंबानी आणि अदानींसारख्या उद्योजकांच्या दावणीला बांधले जातील आणि छोटे दुकानदार उपाशी मरतील असं मत केजरीवाल यांना व्यक्त केलं. तसंच वाराणसीच्या जनतेनी मोदींना मत देऊनये.वाराणसीत शेतकर्‍यांच्या जमिनी मोदींनी लाटल्या आहेत, मोदींना मत म्हणजे तुमच्या जमिनीचा सौदा करणे असंच आहे त्यामुळे मोदींना मत देऊ नका असं आवाहन केजरीवाल यांनी केलं.

अंडे आणि शाईफेक

केजरीवाल आज सकाळी वाराणसीत दाखल झाले. वाराणसीत आल्यानंतर काही वेळातच गंगेत स्नान केलं. आपली मोहीम यशस्वी करण्यासाठी गंगेचे आशीर्वाद घ्यायला आलोय असं यावेळी केजरीवाल यांनी सांगितलं. त्यानंतर केजरीवाल काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनाला जात होते. त्यावेळी मोदी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी केजरीवाल यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी अंडी फेकली. त्यानंतर केजरीवाल यांनी वाराणसीत शक्तीप्रदर्शन करत रॅली काढली. या रॅली दरम्यान केजरीवाल यांच्यावर काळी शाई फेकण्यात आली. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

First published: March 25, 2014, 8:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading