19 मार्च : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या सहाव्या उमेदवारची यादी आज निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत बैठक होतेय. भाजप केंद्रीय निवडणूक समितीच्या आजच्या यादीत गुजरात, राजस्थानसह बिहार, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातील उर्वरित जागांचाही निर्णय होण्याची शक्यता आहे. आजच्या सहाव्या बैठकीत किमान 90 ते 100 उमेदवार भाजप निश्चित करेल अशी शक्यता आहे.
वारणसीमधून भाजपने मोदींना उमेदवारी दिली आहे. 'आप'च्या बैठकीमध्ये अरविंद केजरीवालांनी वाराणसीमधून लढण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र केजरीवाल यांनी यासंदर्भात वाराणसीमध्ये लोकांचं मत आजमावूनच निर्णय घेण्याचं जाहीर केल. मात्र लोकांचा कौल मिळाला तर मोदींना वारणसीमधून केजरीवालांना सामोरं जायला लागू शकतं. त्यामुळे आज नरेंद्र मोदींना गुजरातची जागा जाहीर होऊ शकते. त्याचप्रमाणे लालकृष्ण अडवाणी यांच्या नावाचीही आज घोषणा होऊ शकते.
दरम्यान, महाराष्ट्रातील उर्वरित पाच उमेदवारांच्या नावांचीही घोषणा होणार असून,राज्यातले भाजपचे बडे नेते आज सकाळी आठ वाजता दिल्लीसाठी रवाना झाले. गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि इतर नेते दिल्लीसाठी रवाना झाले. त्यात राज्यातल्या लातूर आणि पुण्याच्या जागेसाठी उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याचं बरोबर धुळे आणि रावेरचा उमेदवार बदलायाचा का? यावरही अंतिम निर्णय आज होण्याची शक्यता आहे.