आप आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

आप आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

  • Share this:

546 aap _bjp05 मार्च : आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यातील मुद्यांची लढाई आता गुद्यावर आलीय. 'आप'चे नेते अरविंद केजरीवाल यांना गुजरातमध्ये अडवल्यामुळे संतप्त 'आप'च्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत राडा केलाय. आपच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत भाजपच्या कार्यालयावर चढाई केली. यावेळी भाजप आणि आपच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री उडाली.

दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली. आता याचे पडसाद लखनौ, अलाहबादमध्येही उमटले आहे. आप आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान मारामारी झालीय. भाजपच्या कार्यकर्त्यांनी जशाच तसे उत्तर देत रस्त्यावर उतरले आहे. दिल्ली पोलिसांनी  कार्यकर्त्यांवर FIR दाखल केला आहे.

आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे तख्त सोडल्यानंतर लोकसभेसाठी मैदानात उतरले. देशभरात झाडू यात्रेसाठी केजरीवाल रस्त्यावर उतरले आहे. आज (बुधवारी) अरविंद केजरीवाल भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यात अर्थात गुजरातमध्ये चार दिवसांच्या रॅलीसाठी दाखल झाले. पण लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे रोड शो किंवा सभेसाठी जिल्हा पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. यासाठी गुजरात पोलिसांनी गुजरातपासून राधनपूर इथं केजरीवाल यांचा ताफा अडवला.

आपल्या नेत्याला अडवल्यामुळे संतप्त आपच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत भाजपच्या कार्यालयावर हल्ला चढवला. अगोदर निदर्शनं त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यासोबत बाचाबाची झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची अधिक कुमक बोलवण्यात आली. जमाव पांगवण्याचा पोलिसांनी पाण्याचे फवारे मारुन प्रयत्न केला पण परिस्थिती आणखी चिघळली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली. जवळपास दोन तास हा राडा सुरू होता. त्यानंतर संध्याकाळी गुजरात पोलिसांनी केजरीवाल यांना सोडून दिल्यानंतर आपचे कार्यकर्ते माघारी परतले. दरम्यान, अहमदाबादमध्येच केजरीवाल यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींने दगडफेक केली. त्यामुळे याचे पडसाद लखनौ आणि अलहाबादमध्येही उमटले.

अलहाबादमध्ये आपच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते जमा झाले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपच्या कार्यकर्त्याची टोपी हिसकावून चौकात जाळून टाकली. तसंच आपचे यांचे पोस्टर फाडून टाकले. त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. दरम्यान, दोन्ही पक्षांच्या कार्यालयांना पोलिसांनी सुरक्षा पुरवली असून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलंय. मात्र दोन्ही पक्षांमध्ये पेटलेली लढाई गुरुवारी आणखी उग्ररुप धारण करण्याची शक्यता आहे.

First published: March 5, 2014, 10:26 PM IST

ताज्या बातम्या