27 फेब्रुवारी : देशभरात मोठ्या भक्तीभावाने महाशिवरात्री साजरी केली जात आहे पण अंधश्रद्धेनं बुरसटलेल्या एका मांत्रिकांने मुलीचा पुर्नजन्म होईल असं सांगत एका 12 वर्षाच्या मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलाय. बेळगाव जिल्ह्यातल्या अथणी तालुक्यामध्ये ही घटना घडली. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार हाणून पाडण्यात आला. मांत्रिकासह 3 जणांना पोलिसांनी अटक केलीय.
अथणी तालुक्यातल्या झुंजवाड गावामध्ये एक मठ आहे. या मठात सदाशिव निमगौडा उर्फ अप्पय्या स्वामी हा मांत्रिक गेल्या अनेक वर्षांपासून तंत्रमंत्र करत होता. त्याने या भागातल्या अनेक नागरिकांना यापूर्वीही फसवलंय. गेल्या 2 फेब्रुवारीला या मांत्रिकाने 4 ते 5 लहान मुलांना या मठात आणलं होतं.
आज महाशिवरात्री असल्यानं चमत्कार दाखवतो असं सांगत या मांत्रिकाने एका 12 वर्षाच्या मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही मुलगी बागलकोट जिल्ह्यातल्या जमखंडी तालुक्यातील आहे. गेल्या 4 दिवसांपासून या मुलीला एका खोलीत बंद करून ठेवण्यात आलं होतं. आणि मध्यरात्री या खोलीला आग लावून त्या मुलीला जाळण्यात येणार होतं. मात्र या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळाली आणि वेळीच पोलिसांनी मठात धाड टाकून हा प्रकार थांबवला. याप्रकरणी मांत्रिकासह 3 जणांना पोलिसांनी अटक केलीय. या भोंदुबाबानं 2006 साली 30 दिवस पाण्यात राहण्याचं एक नाटकही केलं होतं. तसंच जादूटोणा करुन तो नागरिकांना लुबाडही होता. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईने आता या भोंदुबाबाचा पर्दाफाश झालाय.
कोण आहे हा भोंदू?
कर्नाटक : जादूटोणाविरोधी विधेयक