तेलंगणा विधेयकावर राज्यसभेचीही मोहोर

तेलंगणा विधेयकावर राज्यसभेचीही मोहोर

  • Share this:

telangana20 फेब्रुवारी : अखेर 54 वर्षांच्या संघर्षानंतर आज तेलंगणाचा जन्म झाला. देशाच्या पाठीवर 29 वं राज्य म्हणून तेलंगणा उदयास आलंय. आज राज्यसभेत मोठ्या गदारोळानंतर तेलंगणा विधेयकावर राज्यसभेनंही मोहोर उमटवली. प्रचंड गदारोळात झालेल्या चर्चेनंतर लोकसभेपाठोपाठ राज्यसभेनंही तेलंगणा विधेयकाला मंजुरी दिली.

राज्यसभेत आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर करून घेण्यात काँग्रेसला यश आलं. राज्यसभेत तेलंगणा विधेयकाला बसपा, भाजपने पाठिंबा दिला तर शिवसेना आणि सीपीआयने विरोध केला. आता फक्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या सहीची औपचारिकता बाकी आहे. यानंतर स्वतंत्र तेलंगणा राज्य म्हणून उदयास येईल.

हैद्राबाद ही तेलंगणाची राजधानी असणार आहे. तसंच तेलंगणा राज्याच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मार्च महिन्यात हे राज्य अस्तित्वात येईल. आंध्र प्रदेशमध्ये निवडणुकांची घोषणा झालीय. आता तेलंगणा आणि सीमांध्र ही दोन्ही राज्यं निवडणुकीला सामोरी जाणार आहेत.

लोकसभेत मंजुरीनंतर आज राज्यसभेत विधेयक सादर करण्यात आले. अपेक्षेप्रमाणे सीम्रांधाच्या खासदारांनी कडाडून विरोध केला. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी विधेयक सादर केल्यानंतर खासदारांनी एकच गोंधळ घातला. यामुळे कामकाज तहकूब करण्यात आले होते. अखेर संध्याकाळी विधेयकावर चर्चा घेण्यात आली. तरीही विरोधी खासदारांनी विरोध कायम होता. तेलंगणाची निर्मिती बेकायदेशीर, घटनाबाह्य असल्याचे खासदारांनी सभेत फलकही झळकावले. काँग्रेस विभाजनाचं राजकारण करतंय, असा आरोप करत सीमांध्रच्या राजकीय नेत्यांनी तेलंगणाला विरोध केलाय.

तृणमूल काँग्रेसचे नेतेही आज आक्रमक झाले. पंतप्रधान बोलत असताना त्यांनी त्यांच्यासमोर जाऊन तेलंगणा विधेयकाच्या प्रती फाडल्या. तेलंगणा आणि सीमांध्र या दोन राज्यांसाठी हैदराबाद ही संयुक्त राजधानी असणार आहे. पण हैदराबादच्या मुद्द्यावरून सीमांध्र आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये संघर्ष होत राहणार याची चिन्हं दिसायला लागली आहे. लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर वायआसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र बंदची हाक दिली होती. आता पुन्हा एकदा या निर्णयाची प्रतिक्रिया उमटणार आहे.

दरम्यान, सीमांध्रसाठी सहा कलमी पॅकेजची घोषणा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलीय. विशेष म्हणजे काँग्रेसचे खासदार चिरंजीवी यांनी मतदानावर बहिष्कार टाकला. मी काँग्रेस कार्यकर्ता असलो तरी मतदानात सहभागी होणार नाही. हैदराबादसोबत आमचं भावनिक नातं आहे, हैदराबादनं स्वप्नं बघायला शिकवलं. त्यामुळेच आंध्रप्रदेशचं विभाजन होऊ नये अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

राज्यसभेत शिक्कामोर्तब झाल्यानंतर हैद्राबादसह संपूर्ण तेलंगणात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. उस्मानिया विद्यापीठ, काकदिया विद्यापीठ , तेलंगाणा भवन येथे तेलंगणा समर्थकांनी एकच जल्लोष करत आहे.

तेलंगणाचा घटनाक्रम

1960 – उस्मानिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची तेलंगणामधल्या विद्यार्थ्यांबरोबर होणार्‍या भेदभावा विरोधात निदर्शनं

1969 – तेलंगणा प्रजा समितीची स्थापना

1990 – भाजपचं तेलंगणाला स्वतंत्र राज्याच्या दर्जाचं आश्वासन

2001 – के. चंद्रशेखर राव यांच्याकडून तेलंगणा राष्ट्र समितीची स्थापना

2006 – स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्द्यावरून टीआरएसकडून आंध्र प्रदेशाच्या आघाडी सरकारचा पाठिंबा मागे

नोव्हेंबर 2009 – संसदेत तेलंगणा विधेयक मांडण्यासाठी चंद्रशेखर राव यांचं आमरण उपोषण

डिसेंबर 2009 – स्वतंत्र राज्य निर्मितीच्या प्रक्रियेला सुरूवात झाल्याचं तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितलं.

फेब्रुवारी 2010 – तेलंगणाच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी श्रीकृष्ण समितीची स्थापन

डिसेंबर 2010 – श्रीकृष्ण समितीनं 6 पर्याय सुचवले

मार्च 2011 – तेलंगणा समर्थक गटांचा हैद्राबादमध्ये भव्य मोर्चा

2011 – तेलंगणा भागातल्या 100 आमदार आणि खासदारांचा राजीनामा

सप्टेंबर 2012 – सरकारी कर्मचारी, शिक्षकांचा सामूहिक बंद

डिसेंबर 2012 – सर्वपक्षीय बैठकीनंतर गृहमंत्री शिंदेंचं एका महिन्यात तोडगा काढण्याचं आश्वासन

2013 जानेवारी – अंतिम निर्णयाला काही वेळ लागेल- शिंदे

2013 – लोकांना फसवल्याबद्दल चिदंबरम आणि शिंदेंवर गुन्हा दाखल करण्याचा आंध्रप्रदेश कोर्टाचा आदेश

जुलै 2013 – काँग्रेसने तेलंगणाच्या निर्मितीच्या प्रक्रियेला सुरुवात केल्याचं दिग्विजय सिंहांकडून जाहीर

जुलै 2013 – तेलंगणावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी काँग्रेसच्या कोअर कमिटीची चर्चा पूर्ण

2013 – CWC कडून स्वतंत्र तेलंगणा राज्याची घोषणा

3 ऑक्टोबर 2013 – कॅबिनेटचा तेलंगणाच्या निर्मितीला हिरवा कंदील

5 डिसेंबर 2013 – कॅबिनेटची 10 जिल्ह्यांसह स्वतंत्र तेलंगणाच्या मसुद्याला संमती

30 जानेवारी 2014- आंध्र प्रदेश विधानसभेनं तेलंगणा विधेयक फेटाळलं

13 फेब्रुवारी 2014 – प्रचंड गदारोळात लोकसभेत तेलंगणा विधेयक सादर

17 फेब्रुवारी 2014 – लोकसभेत तेलंगणा विधेयक मंजूर 

20 फेब्रुवारी 2014 - तेलंगणा विधेयक राज्यसभेतही मंजूर

 

 

First published: February 20, 2014, 8:41 PM IST

ताज्या बातम्या