'तेलंगणा'वरून गदारोळ सुरूच, कामकाज उद्यापर्यंत तहकूब

'तेलंगणा'वरून गदारोळ सुरूच, कामकाज उद्यापर्यंत तहकूब

  • Share this:

rajya-sabha2-pti19 फेब्रुवारी : तेलंगणा विधेयकाला लोकसभेनं मंजुरी दिल्यानंतर राज्यसभेत मात्र हे विधेयक रखडलं. प्रचंड गदारोळामुळे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं. दुसरीकडे हे विधेयक कोणत्याही दुरुस्त्यांशिवाय मंजूर व्हावं, यासाठी विरोधकांशी चर्चा करायला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पुढाकार घेतलाय. विधेयकात राज्यसभेत दुरुस्त्या झाल्या, तर विधेयक पुन्हा लोकसभेत मांडावं लागणार आहे. चर्चेनंतरच विधेयक मंजूर करण्यात येईल, असं आश्वासन सरकारनं दिलंय.

दरम्यान, आता अशीही माहिती मिळतेय की, सीमांध्रला विशेष दर्जा देण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी खुद्द पंतप्रधानांसोबत चर्चा करणार आहे. दरम्यान,  तेलंगणा विधेयकावरून सकाळी राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. तेलुगू देसम पक्षाचे खासदार सीएम रमेश यांनी राज्यसभेचे सेक्रेटरी जनरल यांना भर सभागृहात धक्काबुक्की केली. रमेश यांच्यासह काही खासदार हे तेलंगणाविषयक कागदपत्र फडकावत होते. तसं करण्यास राज्यसभेच्या उपसभापतींनी मनाई केली. पण सभासद बधले नाहीत.

तर दुसरीकडे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. मुख्यमंत्रीपदासह त्यांनी काँग्रेस पक्षाचं प्राथमिक सदस्यत्व सोडत असल्याचीही घोषणा पत्रकार परिषदेत केली. त्यानंतर राजभवनात जाऊन राज्यपालांकडे राजीनाम्याचं पत्र दिलं. आंध्रप्रदेशचं विभाजन करू नका, अशी सूचना आपण काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना केली होती, असं किरणकुमार रेड्डी यांनी सीएनएन आयबीएनशी बोलताना सांगितलंय. पण काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर पुढचं पाऊल काय, हे बोलायचं त्यांनी टाळलं. काँग्रेसमध्ये परत येण्याची शक्यताही त्यांनी फेटाळली नाही. राजकीय फायद्यासाठी आंध्रचं विभाजन केल्याचा आरोप किरणकुमार रेड्डी यांनी केलाय.

First published: February 19, 2014, 8:12 PM IST

ताज्या बातम्या