केजरीवाल यांनी दिला राजीनामा

केजरीवाल यांनी दिला राजीनामा

  • Share this:

kejriwal resign14 फेब्रुवारी : जनलोकपाल विधेयक मांडू दिलं नाही म्हणून 'प्रेमभंग' झालेल्या आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. जनलोकपाल विधेयक हे आमचे सर्वात मोठे आश्वासन होते त्यामुळे जनलोकपालसाठी शंभर वेळा राजीनामा देईन असं सांगत केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा केली. तसंच दिल्लीत आता राष्ट्रपती राजवट लागू करा आणि पुन्हा निवडणुका घ्या अशी मागणीही त्यांनी केली. केजरीवाल आता नायब राज्यपाल नजीब जंग यांना भेटून आपला राजीनामा सुपूर्द करणार आहे.

यावेळी केजरीवाल यांनी भाजप, काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप आणि काँग्रेसने हातमिळवणी केलीय. त्यामुळे त्यांनी विधेयक सादर करू दिले नाही. वीरप्पा मोईली आणि मुकेश अंबानी यांच्यावर एफआयआर दाखल केले म्हणून त्यांनी विरोध केला. यामुळे त्यांचा खरा चेहरा जनते समोर आलाय असा आरोप केजरीवाल यांनी केला.

केजरीवाल एवढ्यावर थांबले नाहीत. नरेंद्र मोदी आणि भाजपला मुकेश अंबानी पैसा पुरवतात असा आरोपही त्यांनी केला. तसंच केंद्र सरकार काय इंग्रजांचे सरकार आहे का ? आणि नायब राज्यपाल स्वत:ला व्हॉईसराय समजतात का ? असा गंभीर आरोपही केजरीवाल यांनी केला. विशेष म्हणजे 28 डिसेंबर रोजी 'आप'ने सत्ता स्थापन केली होती. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर केजरीवाल यांनी आपल्या याच ऑफिसच्या खिडकीतून कार्यकर्त्यांना अभिवादन केलं होतं. आज त्याच ठिकाणी येऊन केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा केली. अवघ्या 49 दिवसात केजरीवाल यांना सत्तेवरुन पायउत्तार व्हावे लागले आहे.

जनलोकपाल विधेयकासाठी हट्ट

राज्यपाल नजीब जंग यांच्या विरोधात नंतरही आज (शुक्रवारी) दुपारी दोन वाजता दिल्ली विधानसभेत आम आदमी पार्टीने आपलं महत्वाकांक्षी जनलोकपाल विधेयक सादर करण्याचा प्रयत्न केला. मात्र विधेयक सादर करण्याचा आपचा प्रयत्न विरोधकांनी हाणून पाडला. काँग्रेस आणि भाजपच्या आमदारांनी याला कडाडून विरोध केला. जनलोकपाल विधेयकाच्या विरोधात 42 आमदारांनी विरोध दर्शवला तर 27 आमदारांनी पाठिंबा दिला. त्यामुळे जनलोकपाल विधेयक सादर करता येणार नाही असं अध्यक्षांनी स्पष्ट केलं.

त्यामुळे संतापलेल्या केजरीवाल यांनी विधासभेत निवेदन सादर करण्यासाठी उभे राहिले. तेंव्हाही विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. तरीही केजरीवाल यांनी आपले भाषण पूर्ण करत भ्रष्टाचाराच्या विरोधात जर सत्ता टीकत नसेल तर त्याची आम्हाला काळजी नाही. एखाद्यावेळेस हे आमचे शेवटचे सत्र आहे असं स्पष्ट करत केजरीवाल यांनी राजीनाम्याची संकेत दिले. तसंच वीरप्पा मोईली आणि मुकेश अंबानी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केल्यामुळे म्हणून भाजप आणि काँग्रेसने विरोध केलाय असा आरोपही केजरीवाल यांनी केला. केजरीवाल यांच्या भाषणानंतर दिल्ली विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलंय.

त्यानंतर आपच्या नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत केजरीवाल राजीनामा देणार यावर एकमत झालं. त्यानंतर केजरीवाल यांनी आपल्या कार्यालयात येऊन राजीनाम्याची घोषणा केली. यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. केजरीवाल यांच्या निर्णयाचं स्वागत करत जोरदार घोषणाबाजी केली. जनलोकपाल विधेयक मांडू न दिल्यामुळे केजरीवाल यांनी राजीनामा देत असल्याचं जाहीर केलंय. आता दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी केजरीवाल यांनी केलीय.

First published: February 14, 2014, 9:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading