पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी राहुल गांधी सज्ज ?

  • Share this:

Image img_131592_rahulgandhi46_240x180.jpg14 जानेवारी :  लोकशाही वर माझा विश्वास आहे, पंतप्रधान कोण असेल हे जनतेने निवडलेले प्रतिनिधीच ठरवतील असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत. राहुल गांधींनी दैनिक भास्कर या वृत्तपत्राला विशेष मुलाखत दिली आहे. देशाच्या हितासाठी काँग्रेस पक्षच पुन्हा सत्तेत गरजेचंआहे. त्यासाठी पक्ष माझ्यावर जी जबाबदारी सोपवेल ती मी पूर्ण निष्ठेने सांभाळण्याचा प्रयत्न करीन अशा शब्दात राहुल गांधींनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

2014 मध्येही काँग्रेसच पुन्हा एकदा सत्तेत येईल अया विश्वासही राहुल गांधींनी व्यक्त केलाय. मोदींच्या 'काँग्रेसमुक्त भारता'च्या घोषणेवर राहुल गांधींनी जोरदार टीका केली आहे. भाजपला हुकूमशाही देश बनवायचा आहे, लोकशाहीसाठी ही वृत्ती धोकादायक असून 120 कोटी लोकांचं भविष्य आपण एका माणसाच्या हातात सोपवू शकत नाही; देशाला एकत्र ठेवण्याचं काम काँग्रेसनं केलं आहे याची कल्पना काँग्रेस मुक्त भारताची घोषणा देणार्‍या भाजपला नसल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय.

जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्रात आमची आघाडी आहे आणि बिहारमध्येही आम्ही आघाडीचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे यूपीएमधून आघाडी पक्ष निसटून चालले आहेत ही टीका निराधार आहे असल्याचं ही ते म्हणाले आहेत.

तर, आगामी निवडणुकीत प्रियंका गांधी यांची काय भूमिका असणार या प्रश्नावर, प्रियंका पक्षाची सक्रिय कार्यकर्ती आहे. ती मला आणि पक्षाला मजबूत करण्यासाठी मदत करत आहे, पण या व्यतिरिक्त तिची आणखी वेगळी काही भूमिका असेल असं मला वाटत नाही, असं राहुल म्हणाले आहेत.

 

राहुल गांधी म्हणतात...

प्रश्न - पंतप्रधानपदाची जबाबदारी तुम्ही स्वीकारणार काय?

उत्तर - आपण लोकशाही प्रणालीशी बांधील आहोत. आपला लोकशाहीवर विश्वास आहे. जनतेने निवडलेले प्रतिनिधीच ठरवतील की पंतप्रधान कोण असेल. देशहितासाठी म्हणूनच काँग्रेस सत्तेत येणं गरजेचं आहे. त्यासाठी संघटनेनं सध्या माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे किंवा भविष्यात ती जबाबदारी सोपवली जाईल, ती मी पूर्ण निष्ठेने सांभाळण्याचा प्रयत्न करेन.

----------------------------

प्रश्न - असं म्हटलं जातं की, काँग्रेसमध्ये थेट मैदानात उतरून लढणारे आमदार-खासदार राहिले नाहीत?

उत्तर - असं काही नाही, इथं खूपच लोकशाही आहे. काँग्रेसमध्ये अनेक पात्र व्यक्ती आहेत. जनाधार असलेले लोक आहेत. खासदार, आमदार थेट जनतेत जात नाहीत, त्यांच्याशीही मी सहमत नाही. पक्षासोबत युवकांना जोडण्याची गरज आहे. आम्ही गेल्या काही वर्षांत त्या दिशेनं काम केलं आहे आणि यापुढेही करत राहू.

------------------------------------------

प्रश्न - आम आदमी पार्टीकडून काँग्रेस बोध घेईल, असं आपण म्हणत आहात. केजरीवाल यांच्या पक्षाकडून काय शिकणार?

उत्तर - काँग्रेस एक मजबूत पक्ष असून एक सक्रिय संघटना आहे. काँग्रेसने या आधीही देशाच्या राजकारणाची दिशा आणि स्वरूप बदललं आहे, यापुढेही बदलेल. जेव्हा मी राजकारणात आलो, तेव्हापासून आम्ही या मुद्द्यांवर भर देत आलो आहोत. त्यातील काही गोष्टींवर आम आदमी पार्टीनंही अंमल केला आहे. पण मी त्यांच्या पद्धतीशी सहमत नाही.

-------------------------------------------

प्रश्न - भाजपची काँग्रेसमुक्तीची घोषणा आणि नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेबद्दल काय सांगाल?

उत्तर - आज भाजपला व्यक्तिकेंदि्रत सत्ता हवी आहे. हे देशहिताचे नाही, सत्ता कुण्या एका व्यक्तीच्या विचारानं अथवा त्याच्या पद्धतीनं चालवली जाऊ नये. सर्वांना सोबत घेऊन चालल्यानेच देशातील 120 कोटी लोकांचे भवितव्य अधिक उज्ज्वल घडवता येऊ शकेल. या देशाच्या डीएनएमध्ये काँग्रेस आहे. भाजप काँग्रेसमुक्तीचा नारा देत असला तरी आमचा पक्ष देशाशी बांधिलकी जपणारा पक्ष आहे.

First published: January 14, 2014, 2:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading